दरात घसरण झाल्याने गवार पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:15+5:302021-05-08T04:41:15+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, परिसरात अनेक शेतकऱ्यांनी खिशाला आधार देणारे पुणेरी गवारीचे पीक घेतले आहे. सुरुवातीला ...
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, परिसरात अनेक शेतकऱ्यांनी खिशाला आधार देणारे पुणेरी गवारीचे पीक घेतले आहे. सुरुवातीला चांगला दरही मिळाला; पण लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून दरात कमालीची घट होऊ लागली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकात शेतकऱ्यांनी आता जनावरे सोडली असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
पळशी परिसरात उन्हाळी पीक म्हणून बरेचजण गवारीचे पीक घेतात. एप्रिलपासून गवारीची तोडणी सुरू होते. परिसरातील गवारी पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठेत तरकारीने विक्रीसाठी पाठवली जाते. या गवारीला शहरी भागात चांगली मागणीही असते. त्यामुळे सुरुवातीला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळाला; पण लॉकडाऊन झाल्याने बाजारपेठेतील मालाची विक्री कमी होऊ लागल्याने दर अवघा २५ रुपये खाली आला. त्यामुळे वाहतूक भाडेही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या गवारीत शेळ्या मेंढ्या सोडल्या आहेत.
गेल्या वर्षभरापासून शेतीतून काहीच येणे आले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके गेली, तर रब्बीची पिके लॉकडाऊनमध्ये दर उतरल्याने गेली. त्यामुळे यावर्षीचा कोणताच हंगाम शेतकऱ्यांच्या हाती आला नाही.
या वर्षीच्या खरीप हंगामासाठी भांडवल उभा करता यावे, यासाठी उन्हाळी गवार पिकाचे अनेकांनी राम भरोसे
उत्पादन घेतले आहे, पण दर नसल्याने या पिकात आता जनावरे चरत आहेत.
(चौकट)
मजुरी दोनशे रुपये...
सध्या गवारीला पंचवीस रुपये किलो दर दिला जात आहे.
गवार तोडणीसाठी मजुरी २०० रुपये असून, बरदान-थैली, अडत, हमाली, खते, बी-बियाणे, औषधे, खुरपणी आदी खर्चाचा विचार केल्यास उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
०७पळशी
माण तालुक्यातील पळशी परिसरात बाजारपेठेत गवारीचे दर घसरल्याने उभ्या पिकात शेतकऱ्याने जनावरे सोडली आहेत.