‘प्लँचेट’च्या चर्चेमुळे ‘अंनिस’ अस्वस्थ
By admin | Published: July 8, 2014 11:48 PM2014-07-08T23:48:09+5:302014-07-09T00:02:43+5:30
पुणे पोलिसांचा प्रयोग : सखोल चौकशीची मागणी पोलीस महासंचालकांकडे करणार
सातारा : ज्यांनी आयुष्यभर आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना विरोध केला, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे. गृहखात्याने तितक्याच गांभीर्याने त्याची दखल घ्यावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलीस महासंचालकांकडे करणार आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी २० आॅगस्ट रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहा महिने उलटूनही मारेकऱ्यांपर्यंत पोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आता या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या तपासासाठी ‘प्लँचेट’ करून डॉ. दाभोलकर यांच्याच आत्म्याला पाचारण करण्यात आले आणि तपासाची दिशा ठरविण्यात आली, असा आरोप करणारा वृत्तांत एका नियतकालिकात प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी तातडीने हा आरोप फेटाळला आहे. मात्र, या आरोपाची शहानिशा होऊन सत्य महाराष्ट्रासमोर आले पाहिजे, अशी भूमिका ‘अंनिस’ने घेतली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जीवनपट आणि त्यांचे विचार सर्वांनाच माहीत आहेत. अशा व्यक्तीच्या हत्येचा तपास वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अधिकाऱ्यानेच केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. दहा महिने होऊन गेले तरी मारेकरी अद्याप हाती लागत नाहीत, यामुळे लोकांमध्ये आधीच असंतोष आहे. त्यातच तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या जादूटोण्याचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे.’
‘यासंदर्भात प्रसिद्ध झालेला वृत्तांत वाचताना असा प्रकार घडल्याची चर्चा आधीपासूनच होती असा उल्लेख आढळला. अवघड तपासात मंत्रतंत्रांचा वापर पोलिसांकडून केला जातो, हे उघड गुपित आहे. त्यामुळेच अशा आरोपाची तातडीने शहानिशा होणे गरजेचे आहे. पोलीस महासंचालकांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांना निवेदन सादर करणार आहोत,’ असे डॉ. हमीद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)