Satara: लेक भरती झाली; पण आनंद पाहायला माउलीच नाही राहिली!
By सचिन काकडे | Updated: February 10, 2025 18:44 IST2025-02-10T18:44:13+5:302025-02-10T18:44:35+5:30
अत्यंत बेताच्या परिस्थितीतही तिने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. सतत अपयश व अनेक संकटे येऊन देखील ती खचली नाही

Satara: लेक भरती झाली; पण आनंद पाहायला माउलीच नाही राहिली!
सातारा: ‘येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही’ कवी सुरेश भट यांच्या या कवितेच्या ओळी खऱ्या अर्थाने जगल्या असतील तर त्या देवळीमुरा (ता. महाबळेश्वर) येथील अनिता ढेबे (वय २३) हिने. मायेचे छत्र हरपले असतानाही अनिता संकटांवर मात करत पोलिस दलात भरती झाली. मात्र, लेकीचे हे यश पाहण्यापूर्वीच आईने जगाचा निरोप घेतला.
अनिताचे ढेबे हिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, महाविद्यालयीन शिक्षण तळदेव येथील ईलाबेन मेहता विद्यालयात झाले. त्यानंतर मार्गदर्शक विष्णू ढेबे व प्रा. समाधान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बेताच्या परिस्थितीतही तिने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.
सतत अपयश व अनेक संकटे येऊन देखील ती खचली नाही. अडथळ्यांसोबत शर्यत सुरू होती. यश मिळवायचे असेल तर पावलांना थकून चालणार नाही हे तिने आपल्या मनाशी ठाम ठरवले होते. अखेर अडथळ्यांच्या या शर्यतीत अनिता विजयी झाली. पोलिस भरतीत यश मिळवत तिची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.
आपल्या यशाचे सर्व श्रेय अनिता आपल्या वडिलांसह मार्गदर्शक विष्णू ढेबे आणि प्रा. समाधान देशमुख यांना देते. ‘ज्यावेळेस मी निकाल पाहिला त्यावेळेस सर्वप्रथम माझ्यासमोर माझ्या वडिलांचा कष्ट करतानाचा चेहरा आला. पण हे यश पाहायला आज माझी आई हवी होती असं म्हणताना अनिताने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आयुष्यभर माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले. आई तर आम्हाला सोडून गेली, मात्र वडिलांचे पुढचे आयुष्य सुखात घालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
लहानपणापासून अनिता हुशार आहे. तिला शिक्षणाची आवड होती. ती आयुष्यात काहीतरी करेल हा विश्वास होता आणि तिने करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय. आयुष्यभर केलेल्या कष्टाचे चीज झाले. - लक्ष्मण ढेबे, अनिताचे वडील