आॅन ड्युटी ढेबेवाडी; पण मुक्काम पोस्ट कऱ्हाड !

By admin | Published: July 9, 2015 09:26 PM2015-07-09T21:26:33+5:302015-07-10T00:38:28+5:30

पोलीसदादांची रोजची कसरत : उंदीर, साप, घुशींचा वावर वाढल्याने वसाहतीला ठोकला ‘रामराम’; अनेकजण कुटुंबासह फ्लॅटमध्ये

Ann Duty Debevadi; But stay posthard! | आॅन ड्युटी ढेबेवाडी; पण मुक्काम पोस्ट कऱ्हाड !

आॅन ड्युटी ढेबेवाडी; पण मुक्काम पोस्ट कऱ्हाड !

Next

सणबूर : पोलिसांनी नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे; पण सध्या ढेबेवाडी पोलिसांची तऱ्हा निराळीच आहे. ढेबेवाडीतील पोलीस वसाहतीत उंदीर, साप आणि घुशींचा वावर वाढल्याने अनेक पोलीसदादा कुटुंबासह कऱ्हाडात वास्तव्यास आहेत. पोलीस लाईनला रामराम ठोकून ते चक्क भाडेतत्त्वावर फ्लॅटमध्ये राहण्यास गेले आहेत.
पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर शासकीय विभागाच्या तुलनेत नगण्य आहेत. जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र पहारा देणारे पोलीस व त्यांचे कुटुंबीयच सध्या सुरक्षित नसल्याची परिस्थिती आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राहायला सुरक्षित निवाराच नाही, ही खेदाची बाब आहे. पोलीस धोकादायक इमारतीमध्ये राहतो, यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु हे वास्तव आहे. ढेबेवाडीतील पोलीस वसाहतीची अवस्था अतिशय दयनीय आहे. या वसाहतीतील कुटुंबे अनेक वर्षे अनेक संकटांचा सामना करत दिवस ढकलत आहेत. येथील खोल्या पाहिल्यानंतर अनेक धक्कादायक दृष्ये निदर्शनास येतात.
ढेबेवाडी येथे १९६१ साली पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली. त्याचदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयानजीक वसाहत बांधण्यात आली. वसाहतीच्या उभारणीनंतर गेल्या पन्नास वर्षात येथे किरकोळ डागडुजी करण्यात आली आहे. ठोस कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात वसाहतीच्या पाठीमागील बाजूने साप खोल्यांमध्ये शिरल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. या वसाहतीमध्ये एकूण सतरा खोल्या असून, त्यातील चारच खोल्यांमध्ये पोलीस कर्मचारी कुटुंबासह राहतात. इतर खोल्या मोडकळीस आल्याने व राहण्यास योग्य नसल्याने त्या बंद अवस्थेत आहेत. पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपून खोल्यांमध्ये येत असल्याने पोलिसांनी इतर ठिकाणी राहणे पसंत केले आहे. येथील वसाहतीमध्ये रात्रीचे बाहेर पडणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले बहुतांश कर्मचारी वसाहतीत राहतच नाहीत. त्यांनी कऱ्हाड, मलकापूर, आगाशिवनगर परिसरात भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतले आहेत. त्याठिकाणीच ते कुटुंबासह वास्तव्यास असतात.
ढेबेवाडी पोलीस ठाण्यात सध्या ३० कर्मचारी आहेत. तर या पोलीस ठाण्यांतर्गत ढेबेवाडी, कुंभारगाव, तळमावले, काळगाव, सणबूर, मंद्रुळकोळे, मालदन, गुढे, कुठरे, काढणे या राजकीय व गुन्हेगारीदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांसह सुमारे ६५ वाड्यावस्त्यांचा समावेश होतो. कर्मचाऱ्यांच्या सक्षमतेसाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था योग्य असणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

घुशींच्या जोडीला साप, पावसाळ्यात मच्छरांचा ताप
पोलीस वसाहतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच पाठीमागील बाजूस असलेली शौचालयेही अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे त्याचे दरवाजे व खिडक्याही मोडून पडल्या आहेत. पावसाळ्यात येथे प्रचंड दुर्गंधी पसरते. तसेच साप, उंदीर व घुशींच्या जोडीला मच्छरांचीही उत्पत्ती होते. या मच्छरांमुळे येथे वास्तव्यास असणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना जिणे नकोसे होते. पावसाळ्यात पाठीमागील बाजूस जाणे कठीण झालेले आहे. झुडपात मोठ्या प्रमाणात सापांचे वास्तव्य आहे.

ढेबेवाडी पोलीस वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खिडक्या, दरवाजे यासह छतही मोडकळीस आले आहे. गवत व झुडपांचे प्रमाण जास्त आहे. या परिसराची स्वच्छता होण्यासाठी व वसाहतीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. वसाहतीची दुरूस्ती झाल्यास येथील प्रत्येक खोली वापरात येऊ शकते. ज्याचा वापर कर्मचारी करू शकतील. एकूण सतरा खोल्यांपैकी सध्या अनेक खोल्या वापरायोग्य राहिल्या नसल्याचे दिसून येत आहे.
- एन. आर. चौखंडे,
सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Ann Duty Debevadi; But stay posthard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.