अण्णासाहेब सजात..पीक पाहणी जोमात तलाठ्यांचा पराक्रम : सदोष पध्दतीमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:28 AM2018-02-16T00:28:08+5:302018-02-16T00:29:42+5:30
गोडोली : शेतात पिकणारे पीक आणि देशाची अर्थव्यवस्था यांचा जवळचा संबंध आहे. विविध पिकांखाली असलेल्या जमिनीचे अचूक क्षेत्र, घेण्यात आलेल्या पिकांचे विविध प्रकार याची योग्य, खरी अणि अचूक नोंद असणे अत्यावश्यक असल्यानेच गावागावात तलाठ्यांच्या माध्यमातून पीक पाहणी केली जाते. मात्र हे काम शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्याऐवजी कार्यालयात बसूनच काही तलाठी ही पीक पाहणी करत असल्याने या सदोष पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गाव नमुना नंबर १२ अचूक असणे महत्त्वाचे आहे आणि हे काम फक्त आणि फक्त तलाठीच करू शकतात. मात्र शेतकºयाच्या बांधावर जाऊन शेतातील पिकांची पाहणी करून त्याची नोंद गाव नमुना बारामध्ये करणे गरजेचे असताना जिल्ह्यातील काही तलाठ्यांनी कार्यालयात अथवा तालुक्याच्या ठिकाणी बसूनच गावातील पीक पाहणी करण्याचा धडाका लावला आहे. गावकामगार तलाठ्यांच्या या सदोष पीक पाहणीमुळे शेतकºयांना अनंत अडचणींचा सामना करावा तर लागतो आहेच; पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांच्या दारात गेल्यानंतर या सदोष पीक पाहणीचा मोठा फटका बसत आहे.
शेतकऱ्यांना विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करणाºया जिल्हा बँकेने सातबारा उताºयावरील पिकांची नोंद पाहूनच शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत; पण तलाठ्यांनी केलेल्या सदोष पीक पाहणीमुळे दुष्काळावर मात करून शेतात फळबागा किंवा नगदी पिके पिकवणाºया शेतकºयांना गरजेच्या वेळी पतपुरवठा होणे अवघड होऊन बसले आहे.
जिल्हा बँक व विकास सेवा सोसायट्या यांनी कर्ज पुरवठा करत असताना जिरायत व बागायत अशा दोन गटांत शेतीचे वर्गीकरण करून त्यानुसारच कर्जपुरवठ्याचा दर ठरवला आहे.बागायत क्षेत्रात ऊस, द्राक्ष, कांदा, आले, फळबाग, द्राक्ष, हळद, डाळिंब, आंबा, केळी, पेरू, स्ट्रॉबेरी, बटाटा, टिश्यू कल्चर आदी पिकांचा समावेश केला आहे. तर जिरायत क्षेत्रात भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य यांचा समावेश केला आहे.
शेतीक्षेत्रात पदोपदी येत असलेल्या बोगस आकडेवारीचा फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. गाव नमुना बाराच्या नोंदीबरोबर घेऊन त्या साता बाराच्या फॉर्मवर भरायच्या असतात, त्यावर पिकांची नोंद करायची असते, ही नोंद घेत असताना प्रत्यक्ष पाहणी करून तलाठ्य़ाने ही नोंद करावी, असा नियम आहे. मात्र जिल्ह्यातील काही तलाठी प्रत्यक्ष पाहणी करून ही नोंद करत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तलाठ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करायचे ठरविले तर साधा आठ ‘अ’चा नमुना मिळायला सहा महिने लागतील. त्यामुळे तलाठी तालुक्याच्या गावात बसून खातेपूर्ती पीक पाहणी करतो. तीच आकडेवारी तहसीलकडे जाते. याच आकडेवारीच्या आधारावर सरकार योजना बनविते. ‘खोटी आकडेवारी त्यावर योजनांचे भवितव्य असते. वेळप्रसंगी शेतकºयांना भरपाई मिळालीच तर ती सदोष पीक पाहणीमुळे तोकडी नुकसानभरपाई मिळते. तर काही ठिकाणी नुकसानभरपाई किंवा कर्जाचा ज्यादा लाभ मिळावा, यासाठी शेतात फळबाग दाखविली जाते. कारण जेवढी मौल्यवान फळबाग तेवढी नुकसानभरपाई जास्त. हा पराक्रम बहुतेक गावनेत्यांच्या नशिबात अण्णासाहेबांच्या कृपेने येत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.
असा होतो कर्ज पुरवठा
बागायती पिके : ऊस- १ लाख, कांदा- ३४ हजार, आले- १ लाख १५ हजार, आंबा- १८ हजार, द्राक्ष- १ लाख ९६ हजार, द्राक्ष (निर्यातक्षम) २ लाख ८९ हजार, स्ट्रॉबेरी- ३ लाख १२ हजार, स्ट्रॉबेरी (निर्यातक्षम) ५लाख ८ हजार, डाळिंब १ हजार १५ हजार, पेरू- ६६ हजार.
जिरायती पिके : भुईमूग- ३० हजार, ज्वारी- २० हजार, बाजरी- १७ हजार, मका- २४ हजार. (सर्व दर हे हेक्टरी आहेत )
शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच पीक पाहणी करणे, बंधनकारक असताना जर चुकीच्या पद्धतीने पीक पाहणी केली जात असेल अन् तशा तक्रारी आल्यास संबधित तलाठ्यावर कारवाई केली जाईल.
- श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सातारा.
तलाठ्यांच्या चुकीचा त्रास होतो
तलाठ्यांनी शेतावर येत पीक पाहणी करणे गरजेचे असताना ते कधीच तसे करत नाहीत, ते ऐकीव किवा पारंपरिक पद्धतीने पीक पाहणी करतात; पण आम्ही परिस्थितीवर मात करून फळबागा अथवा इतर पिके करत असतो; पण उताºयावर नोंद नसल्याने बँका आम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.
- दीपक येलमार, शेतकरी