अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2015 09:47 PM2015-06-21T21:47:44+5:302015-06-22T00:23:56+5:30

न्याय मागायचा कुठे? : वरकुटे मलवडीसह चार गावांचा प्रश्न; दाखले, सातबारा उतारा वेळेत मिळत नाही

Annasaheb .. there is no problem, no problem! | अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

Next

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडीसह महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी गावांना तलाठी असून, अडचण आणि नसून खोळंबा असाच काहीसा प्रकार गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. सातबारा उतारे, विविध दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.
वरकुटे मलवडी परिसरातील छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांची एकंदरीत लोकसंख्या आठ-दहा हजारांच्या आसपास आहे. या लोकांसाठी मुख्य कार्यक्षेत्र वरकुटे मलवडी हे गाव आहे. वरकुटे मलवडी येथे अनेक वर्षांपासून एकच तलाठी कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी मधुकर सोनवणे हे तलाठी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वरकुटे-मलवडीत दररोज नित्य नियमाने येऊन काम पाहणारा असा एकही तलाठी लोकांना लाभला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गासह विद्यार्थी आणि नागरिकांची दाखला, उताऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.
सोनवणे यांच्या निवृत्तीनंतर बदलीवर आलेल्या तीन-चार तलाठ्यांनी कार्यालयीन दफ्तर आॅनलाईन करावयाच्या नावाखाली टंगळमंगळ करीत कामकाज केले नाही. काही तलाठी वरकुटे मलवडी येथे काम करायचे नाही म्हणून येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांस फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वरकुटे मलवडी येथे तलाठी नियमीत येत नसल्याने सातबारा, दाखले पाहिजे असल्यास सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हसवडला जाऊन ते घ्यावे लागत आहेत. त्यातच सध्या दहावी-बारावीच्या मुलांचे निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता जातीचे दाखले, रहिवाशी दाखले अशा अनेक कागदपत्रांची गरज भासत आहे. अशावेळी वेळेत दाखले मिळत नाहीत. प्रामुख्याने शैक्षणिक कामे वेळेवर पूर्ण नाही झाली तर होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.
तरी संबंधित विभागाने वरकुटे मलवडी येथे कायमस्वरूपी काम पाहणारा तलाठी द्यावा, अशी मागणी वरकुटे मलवडीसह परिसरातील जनतेतून होत आहे. (वार्ताहर)


वरकुटे मलवडीला अनेकांचा नकार...
वरकुटे मलवडी येथे एखाद्या तलाठ्याची बदली झाली तर रुजू होण्यास त्यांचा प्रथम नकारच असतो. त्यामुळे या गावाला वर्षभरात नियमीत येणारा एकही तलाठी लाभलेला नाही. गेल्या एक वर्षापासून अनेक तलाठ्यांनी वरकुटे मलवडी येथे काम पाहिले आहे. त्यामुळे वरकुटे मलवडीसह चार गावांसाठी नियमीत व वेळेवर येणाऱ्या तलाठ्याची प्रतीक्षा आहे. सध्या शाळा, महाविद्यालये प्रवेशाचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वरकुटे मलवडी येथे तलाठ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Annasaheb .. there is no problem, no problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.