गावोगावी प्रती अण्णासाहेब!
By admin | Published: June 26, 2015 09:59 PM2015-06-26T21:59:37+5:302015-06-26T21:59:37+5:30
पाटण तालुका : ग्रामसेवकांच्या पश्चात क्लार्क करतायत सह्या
पाटण : शैक्षणिक दाखले, बँक कर्ज, नोकरी व इतर कारणांसाठी ग्रामसेवकांकडून घराचे ८ अ उतारे मिळवायचे असतात. त्यासाठी ग्रामसेवकाची गरज भासते. मात्र, तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांच्या गैरहजेरीत क्लार्कच सह्या करत असल्याचे सांगण्यात येत आहे.पाटण तालुक्यात २४१ ग्रामपंचायती व ४४८ वाड्या-वस्त्या आहेत. या तालुक्यात ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. गावात जाऊन काम न करणाऱ्या ग्रामसेवकांचे प्रमाणही आहे. यावर पर्याय म्हणून आता चक्क ग्रामसेवकाच्या हाताखाली काम करणारा लिपिकच कारभारी बनले आहेत. अशा प्रती ग्रामसेवकांकडून असली ग्रामसेवकाच्या बोगस सह्या करून दस्ताऐवज व कागदपत्रे देण्याचे प्रताप पाटण तालुक्यात सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीला अनेक ग्रामसेवक गेले होते. तेव्हा लिपिकच ग्रामपंचायतीचे उत्तरे देत असल्यामुळे ग्रामसेवकांच्या पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले. नुकतेच तारळे विभागातील भांबे, कुशी, सावरघर या ग्रामपंचायतींचा ग्रामसेवकाचा तब्बल २५ लाखांचा गैर व्यवहार उघडकीस आला. याबाबत तारळे विभागातील पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी आवाज उठविला. आजही तालुक्यातील ग्रामसेवकांच्या बाबत अनेक तक्रारी आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकाच्या हाताखाली काम करणारे लिपिकच ग्रामसेवकांच्या पश्चात सह्या करतात, असा अनुभव अनेकांना आला आहे. ही बाब गंभीर आहे. (प्रतिनिधी)
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी पाटण तालुक्यातील सुमारे ७० ग्रामसेवक नेमले होते. जर लिपिकने सही करून ग्रामपंचायतीचा उतारा दिला तर तो व्हॅलीड नसतो, आणि जर ग्रामसेवकाची बोगस सही करून लिपिक उतारा देत असेल तर तो गंभीर गुन्हा आहे.
-अरविंद पाटील, गटविकास अधिकारी