अण्णासाहेबांच्या हाती आली लेखणी...
By admin | Published: November 16, 2014 10:11 PM2014-11-16T22:11:11+5:302014-11-16T23:34:23+5:30
डाटा आॅपरेटर संपावर : संगणकावरील दाखले बंद ; एक हजारजण बंदमध्ये
नितीन काळेल -सातारा -गावचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या हाती आता बऱ्याच दिवसांनी दाखले देण्यासाठी लेखणी आली आहे. त्यातच संगणकावरील दाखले मिळत नसल्याने ग्रामस्थांनाही असे दाखले शासकीय कामासाठी चालणार का, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मागण्या मान्य होणार का? म्हणून परिचालक व दाखला चालणार का? म्हणून ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण आहे.
ग्रामपंचायत ही गावचा कणा समजली जाते. ग्रामपंचायतीमार्फत गावचा कारभार पाहिला जातो. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या बरोबरीने ग्रामसेवक गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामसेवक व सरपंचाकडून काही दाखले देण्यात येतात. शासकीय कामांसाठी हे दाखले महत्त्वाचे असतात. मागील काही वर्षांपर्यंत ग्रामसेवकांनी किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने लिहिलेला दाखला चालत होता. मात्र, काही वर्षांपूर्वीपासून ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांच्या जोडीला संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) हे पद निर्माण करण्यात आले. जवळपास राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हे पद तयार झाले. त्यामुळे राज्यात आज सुमारे २७ हजार तर सातारा जिल्ह्यात १०२७ परिचालक कार्यरत आहेत. यांना शासन निर्णयानुसार पगार देण्यात येत आहे. मात्र, या परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. आतापर्यंत संगणकावरून काही सेकंदात दाखल मिळत होता. मात्र, आता या काम बंदमुळे ग्रामसेवकांना दाखला लिहून देणे भाग पडले आहे. दररोज अनेकजण दाखले मागण्यासाठी येतात. त्याची पूर्तता करता-करता दिवस संपत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना या काम बंदमुळे इतर कामांपेक्षा दाखला देण्यातच जास्त वेळ द्यावा लागत आहे.
जिल्ह्यात सुमारे १५०० ग्रामपंचायती असून, सध्या १ हजार २७ संगणक परिचालक कार्यरत आहेत. जवळपास सर्व परिचालकांनी काम बंद केले आहे. त्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक ठिकाणचे संगणकावरून दाखले देण्याचे काम बंद झाले आहे. त्यातच शासनाने हस्तलिखित दाखल ग्राह्य न धरता संगणकावरील दाखलेच गृहित धरण्याचे धोरण आखले आहे. या काम बंदमुळे हस्तलिखित दाखले चालणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मागण्या मान्य होणार का? म्हणून परिचालक तर हस्तलिखित दाखले चालणार का? म्हणून ग्रामस्थ हैराण आहेत.
पंचायत समितीसमोर
आज ठिय्या आंदोलन
मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासाठी चार दिवसांपासून संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यावर विचार न झाल्यामुळे सोमवार, दि. १७ रोजी जिल्ह्यातील काही पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सफाई अभियान हाती घेण्यात येणार आहे.
१९ प्रकारचे
असतात दाखले
ग्रामपंचायतीमार्फत १९ प्रकारचे दाखले देण्यात येतात. आॅनलाईन रजिस्टर नोंद करणे, जन्म, मृत्यूचा दाखला देणे, रहिवासी, वर्तणूक, बांधकाम परवाना, दारिद्र्यरेषेखाली दाखला आदी दाखले देण्यात येतात. संगणकावर डाटा तयार असल्यामुळे काही सेकंदात हे दाखले मिळत होते; पण आता हस्तलिखितामुळे खूपच वेळ जात आहे.
आम्ही सर्वांची काळजी करतो. दाखले देण्याची जबाबदारी आम्हीच घेतो. लोकांचे ऐकतो; पण आमची काळजी शासनाला नाही. आमच्या मागण्यांबाबत कोणी ऐकत नाही. म्हणून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
-प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष
संगणक परिचालक संघटना
संगणक परिचालकांच्या काम बंद आंदोलनामुळे संगणकावरील दाखले देणे जवळपास बंद झाले आहे. जिल्ह्णात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ग्रामसेवकांनाच दाखला लिहून देणे भाग पडले आहे.
- खाशाबा जाधव, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना
तोकडा पगार...
१३ व्या वित्त आयोगातून ८ हजार ५०० रुपये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग होतात. तेथून संबंधित एका कंपनीकडे हे पैसे जातात. त्यानंतर ती कंपनी संगणक परिचालकांना पगार देते. बारावीवाल्यांना ३ हजार ८०० तर, पदवीधारकांना ४ हजार १०० रुपये देण्यात येतात. त्यामुळे कमी पगार मिळत असल्याचाही आरोप संघटना करीत आहे.