ऐन उन्हाळ्यात वीज कंपनीचा मेंटेनन्स, साताराकर घामाघूम : तापमान ३९ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:05 PM2018-04-03T17:05:45+5:302018-04-03T17:05:45+5:30
उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात आली आहे. त्यामुळे वीज कंपनी एकप्रकारे सुड उगवत आहे की काय, अशी विचारणा नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून घामाच्या धारा लागत आहेत.
सातारा : उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात आली आहे.
वीज कंपनी एकप्रकारे सुड उगवत आहे की काय, अशी विचारणा नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून घामाच्या धारा लागत आहेत.
गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून जिल्ह्यातील पूर्व भागात तर ४० च्या आसपास आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे.
वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास सर्वजण घरात थांबणे पसंद करतात. त्यावेळी पंखा, एसी, कुलरचा वापर करण्यात येत आहे. असे असतानाच वीज कंपनीकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे.
साताऱ्यात तर मंगळवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून मेंटेशन्ससाठी वीज बंद करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. येथून पुढे गरज असेल त्यावेळी मंगळवारच्या दिवशी वीज बंद ठेवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना उनाबरोबच वीज नसल्याने त्रास सहन करावा लागणार आहे.
दुसरीकडे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद पडले आहेत. त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न पडला आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर विजेचे थकित बील असल्याने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, असे सांगण्यात आले. ऐन उन्हाळ्यातच वीज कंपनीचा असा कारभार सुरू असल्याने नागरिकांसह शेतकरीही हैराण झाले आहेत.