प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमनची उडाली भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:17+5:302021-08-23T04:42:17+5:30
सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाली. गतवर्षीप्रमाणे याही वर्षीच्या वार्षिक सभेत बँकेच्या ...
सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाली. गतवर्षीप्रमाणे याही वर्षीच्या वार्षिक सभेत बँकेच्या सर्व सभासदांचा आवाज बंद ठेवल्याने सर्व सभासदांचा आवाज चालू करा, ही जोरदार मागणी घेऊन शिक्षक समितीच्या संचालकांनी सुमारे दीड तास सभेत गोंधळ घालून सभा रोखून धरली.
वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्व विषयांना सभासदांची मंजुरी आवश्यक असते. परंतु, याचा विसर विद्यमान चेअरमन राजेंद्र घोरपडे यांना पडला होता. अध्यक्षांनी आपल्या विषयांना समोर बसलेल्या स्वतःच्या संचालकांची मंजुरी घेत ही सभा गोंधळात पार पाडली.
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सोयीचे प्रश्न फक्त घेतले आणि आपले पितळ उघड पाडणारे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न चेअरमननी केला. यावेळी सर्व प्रश्न घेण्याची मागणी शिक्षक समितीच्या संचालकांनी केली असता, प्रश्नांची उत्तरे देताना विद्यमान चेअरमनची भंबेरी उडाल्याचे सर्वांनी पाहिले. अखेर चेअरमननी सभेतच शिक्षक समितीच्या संचालकांचा एकेरी भाषेत उल्लेख केला.
या सर्व गोष्टींचा निषेध करत सभासदांचा आवाज सुरू न केल्याने आणि प्रश्नांची समर्पक उत्तरे न दिल्याने शिक्षक समितीच्या संचालकांनी सभात्याग करून शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेची प्रतिसभा ऑनलाईन पद्धतीने घेतली. या सभेत विद्यमान चेअरमननी काढलेले स्वतःचे नियमबाह्य कर्ज प्रकरण, बँकेचा नियोजनशून्य कारभार, गरज नसताना केलेली नोकर भरती यासारख्या अनेक प्रश्नांवर शिक्षक समितीच्या संचालकांनी व सभासदांनी प्रतिसभेत मत मांडले.
या वार्षिक सर्वसाधारण प्रतिसभेला राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शंकर देवरे, प्रदीप कदम, विठ्ठल फडतरे, संजय नांगरे, संतोष घोडके यांच्यासह शिक्षक समितीचे संचालक किरण यादव, शिवाजी शिंदे, चंद्रकांत मोरे, सुभाष शेवाळे व अनेक तालुक्यांचे अध्यक्ष, चिटणीस व कार्यकारिणीतील सर्व सभासद असे सुमारे ४०० सभासद उपस्थित होते.
चौकट
या सभेत बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी प्रास्तविकात बँकेच्या कार्याचा आढावा घेतला.