आगळावेगळा सोहळा! साडीचा पाळणा... झाडांचं तोरण; उसाच्या फडात ‘संस्कृती’चं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:25 PM2022-12-26T16:25:50+5:302022-12-26T16:26:19+5:30
'प्रसूती झाली अन् आठव्या दिवशी मुलीला घेऊन कामावर. कुठलं बारसं अन् कुठलं काय'
सचिन काकडे
सातारा : दोन महिन्यांपूर्वी त्या मातेची प्रसूती झाली. आपल्या लेकीला पोटाला कवटाळून तिने थेट सातारा गाठला. मग काय, हातात कोयता घेऊन त्या मातेची उसासोबत उदरनिर्वाहाची झुंज सुरू झाली. सातारा रोड येथील एका दाम्पत्याची त्या चिमुकलीवर नजर पडते. मुलीचे उसाच्या फडातच बारसे घातले जाते. तिचे नामकरणही केले जाते. ही कुठल्या चित्रपटातील कथा नव्हे, तर सातारा रोड (ता.कोरेगाव) येथील खरीखुरी घटना आहे.
येथील संस्कृती महिला मंडळाच्या अध्यक्ष शीतल फाळके यांच्या शेतात बीड जिल्ह्यातून आलेल्या एका टोळीकडून ऊसतोड सुरू होती. यावेळी पती नीलेश फाळके यांनी शेतात एका मातेला दोन महिन्यांच्या मुलीसमवेत काम करताना पहिले. रंजना पडोळकर असे त्या मातेचे नाव. मुलीचे बारसे घातले का? असे विचारल्यानंतर त्या मातेने सांगितले, ‘माझी प्रसूती झाली अन् आठव्या दिवशी मी मुलीला घेऊन कामावर आले. कुठलं बारसं अन् कुठलं काय,’ हे ऐकून नीलेश फाळके यांना गहिवरून आले. त्यांनी सारी हकिकत पत्नी शीतल यांनी सांगितली. त्याच दिवशी शीतल यांचाही वाढदिवस होता. त्यांनी तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले.
ठरल्याप्रमाणे शीतल फाळके महिलांसह उसाच्या फडात आल्या. येथे झाडांना साडीचा पाळणा बांधण्यात आला. त्याला फुग्यांची सजावट करण्यात आली. यानंतर, रंजना पाडोळकर यांच्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला नवीन कपडे घालण्यात आले. पाळण्यात घालून तिचा नामकरण सोहळाही करण्यात आला. संस्कृती महिला मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत, हा अनोखा सोहळा साजरा केल्याने, त्या चिमुकलीने नावही ‘संस्कृती’ ठेवण्यात आले. यावेळी रंजना पाडोळकर यांची ओटीही भरण्यात आली. जरंडेश्वर केटरर्सचे संदीप फाळके, किसन घाडगे यांनी सर्वांना गोड-धोड खाऊ घातले.
उसाच्या फडात पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आम्ही धागा झालो, असे मत अंगणवाडीसेविका स्वाती घाडगे, अनिता सुतार, वंदना ताटे, रूपाली सुतार, गौरी गाढवे, योगिता फाळके, भारती फाळके, रजनी घाडगे, अनुजा मिठारे, संगीता रावन, वंदना फाळके, सुमन वाघमारे, उर्मिला ताटे, रूपाली फाळके, शीतल जाधव, मनीषा फाळके यांनी व्यक्त केले.
ऊसतोड मजुरांची पोटासाठी कायमच वणवण सुरू असते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे ते फारसे लक्ष देत नाहीत. आज आम्ही त्या चिमुकलीचे केवळ बारसेच घातले नाही, तर तिच्या संपूर्ण शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली आहे. ती मुलगी उद्या शिकली, मोठी झाली, तर नक्कीच ती तिची पुढची पिढी साक्षर करेल, असे आम्हाला वाटते. - शीतल फाळके, सातारा रोड-पाडळी.