आणखी एका ‘पुतण्या’चं ‘काका’विरोधात बंड !

By admin | Published: September 16, 2016 10:55 PM2016-09-16T22:55:14+5:302016-09-16T23:42:43+5:30

कऱ्हाड दक्षिणेत भाऊबंदकीचा नवा अध्याय : राजाभाऊंच्या हातात राष्ट्रवादीचं घड्याळ; विलासकाकांना धक्का

Another rebutant against 'uncle'! | आणखी एका ‘पुतण्या’चं ‘काका’विरोधात बंड !

आणखी एका ‘पुतण्या’चं ‘काका’विरोधात बंड !

Next

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड --राज्यात अनेक पुतण्यांनी आपल्या काकांच्या अडचणीत वाढ केल्याच्या घटना आहेत. धाकटे पवार तर वरचेवर थोरल्या पवारांच्या अडचणीत वाढ करीत असतात म्हणे. राज ठाकरे, धनंजय मुंडेंनी तर थेट काकांविरोधातच बंड केले. असाच एक प्रकार कऱ्हाड तालुक्यातही घडला असून, गेली दोन वर्षे उंडाळेतील क्रांतिवीरांच्या घरातील धुमसत असणाऱ्या वादाला गणेश विसर्जनादिवशी जाहीर तोंड फुटले. पुतणे अ‍ॅड. आनंदराव पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षे आपला दबदबा ठेवण्याचे काम ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले. कऱ्हाड दक्षिणचे सलग ३५ वर्षे आमदार, तालुक्यातील बहुतांश संस्था ताब्यात, जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात ठेवणारे उंडाळकर सातारा मुक्कामीच असायचे. अशावेळी उंडाळे परिसरातील किंबहुना दक्षिण विधानसभा मतदार संघातील राजकारण सांभाळायला त्यांचे ज्येष्ठ बंधू जयसिंगराव पाटील-बापू यांची मोलाची साथ लाभली, हे नाकारता येणार नाही; पण या दोन भावांनी जोपासलेले सख्य पुढच्या पिढीला राखता आले नाही. त्यामुळेच आज दोन चुलत भावांची तोंडे दोन दिशेला झालेली दिसत आहेत.
खरंतर गत विधानसभा निवडणुकीपर्यंत सारं काही अलबेल दिसत होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विलासराव पाटील-उंडाळकरांनी बंड केल्यानंतर अ‍ॅड. आनंदराव पाटील प्रचारात सक्रिय दिसत होते. त्यात उंडाळकरांचा पराभव झाला आणि काही दिवसांतच अंतर्गत कलहाची चुळबूळ बाहेर येऊ लागली. पराभवाची कारणमीमांसा करताना दबक्या आवाजात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. विलासकाकांचे पुत्र एका खटल्यातून निर्दाेष बाहेर आले; पण अ‍ॅड. उदयसिंह व अ‍ॅड. आनंदराव यांच्यात सुसंवाद दिसलाच नाही.
गतवर्षी ११ नोव्हेंबरला अ‍ॅड. आनंदराव पाटील यांनी प्रथमच आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. वाढदिवसाला मिळालेल्या प्रतिसादामुळे हा ‘राजा’माणूस चांगलाच ‘भाव’ खाऊन गेला; पण त्यावेळी काका व चुलत भावाच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या, तर कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते राजाभाऊंचा केक कापायला उपस्थित होते, हे विशेष. विषय येथेच संपला नाही. तर विलासराव उंडाळकरांनी एका कार्यक्रमात ‘फ्लेक्स लावून नेता होता येत नाही,’ अशा कानपिचक्या नाव न घेता पुतण्याला दिल्या. त्यानंतर विलासराव पाटील-उंडाळकरांनी घेतलेल्या ग्रामसभेला जयसिंगराव पाटील व अ‍ॅड. आनंदराव पाटील दोघेही अनुपस्थित होते. त्यावेळीही त्यांनी ग्रामसभेत कोणी कोणत्या झाडाखाली बसायचं हे ठरवा,
असे सूचक वक्तव्य केले होते.
(क्रमश:)


विधानसभेचा उमेदवार कोण?
कऱ्हाड दक्षिणेत राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम ठेवण्याचे काम विलासराव पाटील-वाठारकर यांनी हयातभर केले. त्यांच्या पश्चात राजेश पाटील-वाठारकरही शरद पवार, अजित पवार यांचेच नेतृत्व माणून काम करीत आहेत. गत काही वर्षांत कऱ्हाड शहराचा समावेश दक्षिण विधानसभा मतदार संघात झाल्याने उत्तरची ताकदही दक्षिणेतील राष्ट्रवादीला मिळाल्याने कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. त्यानंतर कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि आता उंडाळकरांचे पुतणे अ‍ॅड. आनंदराव पाटील हेही राष्ट्रवादीत येत आहेत. त्यामुळे दक्षिणेत राष्ट्रवादीची ताकद वाढत चालली आहे खरी; पण आगामी विधानसभेला दक्षिणेतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? राजेश पाटील-वाठारकर, अविनाश मोहिते-रेठरेकर, अ‍ॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर की उत्तरचे आमदार बंधू सुभाष पाटील, जयंत पाटील, हे समजायला मार्ग नाही.

Web Title: Another rebutant against 'uncle'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.