ऑनलाईनवरील परीक्षेत उत्तरेही इंटरनेटवरुनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:39 AM2021-05-09T04:39:49+5:302021-05-09T04:39:49+5:30
लहान मुलांनी मोबाईल वापरावा की नाही, याबाबत पहिल्यापासूनच समाजात दोन मतप्रवाह होते. काहींच्या मते मोबाईलमुळे मुलांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून ...
लहान मुलांनी मोबाईल वापरावा की नाही, याबाबत पहिल्यापासूनच समाजात दोन मतप्रवाह होते. काहींच्या मते मोबाईलमुळे मुलांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेता येईल. पुढे जाऊन त्यांना हेच करायचे आहे. तर काहींच्या मते मोबाईलमुळे मुलांमध्ये अनेक वाईट सवयी लागतील. चष्मा लागणे, स्वत: अभ्यास करण्याची सवय कमी होईल. पण कोरोना आला अन् सारंच बदलून गेलं.
शहरापासून ग्रामीण भागातील मुलांची शाळा ऑनलाईनच सुरू आहे. शिक्षकही व्हिडीओ बनवून मुलांना पाठवत होते. तेथेच त्यांना गृहपाठ करण्यासही सांगत होते. त्यानंतर मुलांना आपण शिकवत आहोत, ते त्यांना कितपत समजले, हे कळण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. काही विषयात अभ्यास केल्यानंतर किंवा क्रमिक पुस्तकातच उत्तरे लिहिता येतात. पण विज्ञान, गणित या विषयांच्या परीक्षेत असंख्य मुलांनी गुगलवर प्रश्न टाकून त्याची उत्तरे मिळवून लिहिली होती. यामुळे मुलांची स्वत: अभ्यास करण्याची सवयच कमी होण्याचा धोका आहे.
हा प्रकार पालकांच्याही लक्षात येत आहे. चाललंय हे चुकीचं आहे, हे कळत असूनही ‘आपला मुलगा किंवा मुलगी कशी उत्तरे शोधतात. त्यांना कोणी शिकवलं आहे का?’ असा विचार करुन कौतुकच करतात. पण हे धोक्याचं ठरू शकतं, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
- जगदीश कोष्टी
चौकट
मोठ्यांचीही तीच अवस्था
अनेक विद्यापीठांच्याही काही परीक्षा ऑनलाईन होत्या. त्यामध्ये जनरल नॉलेजच्या प्रश्नांची उत्तरेही इंटरनेटवरच शोधली जात होती. मित्र-मैत्रीण किंवा पत्नीची मदत घेऊन तिला दुसऱ्या मोबाईलवर उत्तरे शोधण्यास सांगितले जात होते.
कोट
ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे पालकांनी स्वागतच केले आहे. पण परीक्षा पद्धतीचा मात्र विचार व्हायला हवा. मुलांना उत्तरे लिहिण्यासाठी पुस्तकेच वाचावी लागतील, अशी प्रश्नपत्रिका बनविण्याची गरज आहे. सामान्यज्ञानमध्ये दैनंदिन जगण्यातील प्रश्न असतील तर इंटरनेटवर उत्तरे न मिळाल्याने मुलं स्वत: शोधतील अन् ज्ञानात भर पडेल. पण इंटरनेटवरुन उत्तरे शोधून काहीच उपयोग होणार नाही.
- संजय केसकर, सातारा.