नागठाणेत मोकाट फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:59+5:302021-05-27T04:40:59+5:30
नागठाणे : गेल्या काही महिन्यांपासून नागठाणे (ता. सातारा) गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अनेकदा पोलीस व ...
नागठाणे : गेल्या काही महिन्यांपासून नागठाणे (ता. सातारा) गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अनेकदा पोलीस व ग्रामपंचायतीने सूचना देऊनही अनेकजण विविध कारणांच्या निमित्ताने घराबाहेर पडून प्रशासनाला गुंगारा देत होते. बुधवारी सकाळी अखेर प्रशासनाने विनाकारण भटकणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली.
नागठाणे ग्रामपंचायत, बोरगाव पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राने ही धडक मोहीम राबविली. गावातील मारुती मंदिर परिसर, बेघर वस्ती, सासपडे चौक व मुख्य महामार्ग चौक येथे ही मोहीम राबविली गेली. यावेळी विनाकारण बाहेर भटकणाऱ्या १७ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली.
सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, ग्रामसेवक सचिन पवार, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी ही धडक मोहीम राबविली. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत ही मोहीम सुरूच असणार असून, तपासणीत जे पॉझिटिव्ह आढळणार आहेत त्यांची रवानगी थेट कोविड सेंटरला करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.