विद्यार्थ्यांचीही आता अॅन्टीजेन टेस्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:41 PM2020-11-23T12:41:28+5:302020-11-23T12:43:30+5:30
शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर अनेक शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत विद्यार्थ्यांचीही रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. मात्र, संबंधित शहर, जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
सातारा : शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर अनेक शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत विद्यार्थ्यांचीही रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. मात्र, संबंधित शहर, जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ६ हजार ७८४ शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ३३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व विद्यार्थी घरीच आहेत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या अॅन्टीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही विद्यार्थ्यांच्या टेस्ट करण्याच्या विचारात आहे.
पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या टेस्ट केल्या जाणार आहेत. जर गरज भासली तरच विद्यार्थ्यांच्या टेस्ट केल्या जातील, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात एकूण शिक्षक आणि कर्मचारी संख्या दहा हजार आहे. या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य विभाग केल्या चार दिवसांपासून दिवसभर मेहनत घेत आहे. अद्याप कोरोनाची स्थिती सुधारली नसल्याने शाळेत येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्याची मागणीही पालकांमधून होत आहे.
शाळा सुरू झाली तर विद्यार्थ्यांना रिक्षाने शाळेत जावे लागणार आहे. या रिक्षाचे रोज निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे येणारा खर्च पालकांवर की स्वत: रिक्षाचालक करणार, यावर सध्या पालकांमध्ये खल सुरू आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे मुलांना शाळेत सोडायचे की नाही, यावर पालक संभ्रमात आहेत. काही पालकांनी अजून काही दिवस शाळा बंद ठेवल्या तरी चालेल, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केलीय.
म्हणे टेस्ट गरजेची....
कोरोना बाधितांमध्ये अलीकडे लहान मुलांचा समावेश नाही. वयस्कर लोकच बाधित आढळून येत आहेत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्याही टेस्ट करणे गरजेचे असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.