घरात पालकांची चिंता आणि रुग्णालयात चिमुकल्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:47+5:302021-08-21T04:44:47+5:30
सातारा : कोविडच्या तिसऱ्या लाटेची अनिश्चितता असली तरीही, वातावरणातील संसर्गाने चांगलेच डोके वर काढले आहे. घरात मुले आजारी असल्याने ...
सातारा : कोविडच्या तिसऱ्या लाटेची अनिश्चितता असली तरीही, वातावरणातील संसर्गाने चांगलेच डोके वर काढले आहे. घरात मुले आजारी असल्याने पालकांची चिंता, तर रुग्णालयात चिमुकल्यांची संख्या वाढू लागली आहे. डेंग्यूच्या संकटापासून दूर राहायचे असेल, तर अंगावर आजार काढणे आणि मेडिकलमधून परस्पर औषधे घेणे धोक्याचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असताना लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. त्यातच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांची ओपीडी दुपटीने वाढली आहे. यात सर्वाधिक रुग्ण डेंग्यूचे असल्याचे आढळून आले आहे. वातावरणातील बदलांसोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्याचाच फटका चिमुकल्यांना बसत आहे. घशात खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येण्याचे प्रकार वाढले आहेत.
चौकट :
ही काळजी घ्या...
घरात व परिसरात स्वच्छता बाळगा. डासांची उत्पत्ती होणार नाही याची विशेष काळजी घ्या.
पिण्याचे पाणी स्वच्छ करूनच मुलांना प्यायला द्या. शक्य असल्यास पाणी उकळल्यानंतर थंड करून ते पिण्यासाठी उपयोगात आणा
मुलांना सकस आहार द्या. शक्यतोवर उघड्यावरील खाद्यपदार्थ देणे टाळा
डेंग्यू, टायफाॅईडचेही रुग्ण वाढल्याने चिंता
कोविड काळातील तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या लहान मुलांना न्यूमोनियासह विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल लहान मुलांमध्ये डेंग्यू तसेच मलेरिया व टायफाॅईडच्या रुग्णांचाही समावेश आहे. त्या त्या पातळीवर त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र ही संख्या या महिन्यात अधिक वाढली आहे.
छोट्या मुलांची कोरोना चाचणी
शासकीय रुग्णालयासह आरोग्य केंद्रांवर न्यूमोनिया असलेल्या लहान मुलांची संख्या वाढली आहे. यातील काही मुलांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून या सर्व मुलांची कोरोना चाचणी केली जात आहे.
१२ ते १३ लहान मुलांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. यात एक वर्षांखालील बालकांची संख्या अधिक आहे.
नवजात शिशू काळजी कक्षात एक वर्षांखालील ४० पेक्षा अधिक बालकांवर उपचार सुरू आहेत.
कोट :
वातावरणातील बदलांमुळे मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांकडे दुर्लक्ष केले तरच ते जिवावर बेतू शकते. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी ही लक्षणे आढळून आली, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं उपयुक्त आहे.
- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील बदलांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. ऋतुचक्रानुसार होणाऱ्या या बदलाचा फटका लहान मुलांना सर्वाधिक बसतो. त्यामुळे अंगावर आजार न काढता तातडीने त्यावर उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.
- डॉ. देवदत्त गायकवाड, बालरोगतज्ज्ञ, सातारा