कुणीही या अन् आरक्षित आसनावर बसा !

By Admin | Published: March 21, 2017 11:23 PM2017-03-21T23:23:19+5:302017-03-21T23:23:19+5:30

एसटीमधील स्थिती : लाभार्थ्यांचा उभा राहूनच प्रवास; नियम झाले बिनकामाचे; आरक्षित आसन व्यवस्थेकडे दुर्लक्ष

Anybody sitting on the reserved seats! | कुणीही या अन् आरक्षित आसनावर बसा !

कुणीही या अन् आरक्षित आसनावर बसा !

googlenewsNext


कऱ्हाड : प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अनेक चांगल्या व नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. त्याचा प्रवाशांना चांगला फायदाही होत आहे. सुखी व सुरक्षित प्रवास घडविणे हे मुख्य एसटी प्रशासनाचे कार्य. ते डोळ्यासमोर ठेवून एसटी गाड्यांमध्ये प्रवाशांच्या वर्गवारीनुसार बसण्यासाठी स्वतंत्र आसन आरक्षणे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, आज या आसन आरक्षणाच्या नियमांचे खुद्द एसटी वाहकांसमोरच प्रवाशांकडून उल्लंघन केले जात असल्याने त्याबाबत काहीच कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
सर्वसामान्य प्रवासी, शासकीय कर्मचारी, विधान परिषद तसेच विधानसभा आमदार, खासदार व स्वातंत्र्यसैनिक, अपंग व्यक्ती, महिला वर्गासाठी एसटीत ठराविक आसने आरक्षित करण्यात आली. मात्र, त्याचा योग्य तो वापर सध्या होताना दिसून येत नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या नियमांचे खुद्द प्रवाशांकडूनच उल्लंघन होत आहे. याकडे मात्र, महामंडळ प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने याचा नाहक त्रास आसन आरक्षित करण्यात आलेल्या वर्गातील प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी या-ना त्या कारणाने वारंवार चर्चेत असते. सध्या एका सामान्य पण हिताच्या कारणाने एसटी चांगलीच चर्चेत आहे. ते कारण म्हणजे प्रवाशांना बसण्यासाठी एसटीत करण्यात आलेली आरक्षित जागा. एसटी बसेसमध्ये सर्वसामान्य प्रवासी सोडले तर इतर विशेष अशा दहा प्रवाशांसाठी राखीव जागा आरक्षित केलेल्या असतात. यामध्ये विधानमंडळ सदस्य, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, संकटकालीन मार्ग, महिला, पत्रकार, राज्य परिवहन मंडळ कर्मचारी, वाहक व विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रमुख जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सध्या या आरक्षित केलेल्या जागांचे नियम कुणीच पाळत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे एसटीतील वाहकांना या आरक्षित जागांवर त्या संबंधित व्यक्तीने मागणी केल्यास त्यांना बसण्यास जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे खुद्द वाहकांकडूनच दुर्लक्ष केले जात असल्याने जागा असूनही महिला वर्गास तसेच अपंग व्यक्तीस उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
आरक्षित जागेवर बसण्यावरून महिला व पुरुषांमध्ये अनेकवेळा वादावादीचे प्रसंगही घडत असतात. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात एसटीतील वाहकाकडून पुढाकार घेतला जातो. मात्र, याबाबत कायमस्वरूपी नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून वाहकांना सूचना करणे गरजेच्या आहेत, अशी मागणीही प्रवाशांतून अनेकवेळा करण्यात आली आहे.
एसटीच्या नियमांचे उल्लंघन करण्यास प्रवाशांबरोबर वाहक व चालकांचाही समावेश असतो. धूम्रपान करू नये, मोबाईल वापरू नये, स्वच्छता राखावी, खिडकीतून हात बाहेर काढू नये, तसेच ध्वनिप्रदूषण करू नये, अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन ही केले जाते. याबाबत वाहकांकडून तसेच चालकांकडून काहीच उपाय केले जात नाही.
वारंवार होत असलेल्या या आसन आरक्षणांच्या नियमांच्या उल्लंघनामुळे सध्या बसगाडीमध्ये अपंग प्रवाशाला त्याची हक्काची जागा असून देखील बसता येत नाही. किंवा त्यांनी वाहकाला विनंती केल्यास त्यांच्याकडूनही लक्ष दिले जात नाही. कऱ्हाड बसस्थानक प्रशासनाकडून अशा नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anybody sitting on the reserved seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.