कुणीही यावं... मारहाण करून जावं!

By admin | Published: February 8, 2016 12:08 AM2016-02-08T00:08:10+5:302016-02-08T00:30:26+5:30

कुठायत आमचे ‘कुटुंबप्रमुख’? : जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल; आवारात पोलीस चौकीची मागणी

Anyone want to ... be beaten up! | कुणीही यावं... मारहाण करून जावं!

कुणीही यावं... मारहाण करून जावं!

Next

सातारा : ‘कुणीही यावं अन् मारहाण करून जावं, अशी आमची स्थिती झाली आहे. रुग्णालयात घडणाऱ्या हिंसक घटनांबाबत अनेकदा पोलिसांत तक्रारी दाखल होत नाहीत. झाल्याच तर दबाव टाकून मागे घ्यायला भाग पाडले जाते. कालसुद्धा एकही अधिकारी आमच्याबरोबर अधिकारी पोलीस ठाण्यात आला नाही,’ अशी कैफियत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रविवारी मांडली. रुग्णालयाच्या आवारात तातडीने पोलीस चौकी उभारण्याच्या मागणीचा जोरदार पुनरुच्चार त्यांनी केला.
रुग्णालयातील रात्रपाळीचे रखवालदार आनंदा प्रकाश घाडगे यांना शनिवारी रात्री एका तरुणाने दारू पिऊन मारहाण केल्याची फिर्याद कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, तक्रार देण्यास ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून कुणीही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, याचे शल्य त्यांना आहे. ‘आम्ही लोकांची सेवा करतो; मात्र आम्हाला कोणी वाली नाही,’ असा सूर कर्मचाऱ्यांनी लावला.दत्तात्रय कडाळे याने दुसऱ्या मजल्यावरील वॉर्ड नऊमध्ये राडा केला. हा महिला वॉर्ड आहे. रात्री साडेनऊनंतर कुणाचे ड्रेसिंग करायचे असते, तर कुणाला कपडे बदलायचे असतात. त्यामुळे पुरुष नातेवाइकांना या वॉर्डात रात्री थांबू दिले जात नाही. ‘नियमाची अंमलबजावणी करण्यासाठीच गेलो होतो; पण दत्तात्रय कडाळे याने थेट माझा गळा पकडला,’ असे सांगून घाडगे यांनी नखांमुळे गळ्यावर झालेल्या जखमा दाखविल्या. घाडगे यांचा हातही जोरात पिरगाळल्याने दुखावला आहे. ‘मी मध्यस्थी केली असता कडाळेने माझ्या पोटात लाथ हाणली,’ असे दुसरे रखवालदार खंडोबा बुधावले यांनी सांगितले.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक नऊमध्ये निर्मला गोरे आणि सुनीता मसुगडे या दोन आरोग्यसेविका रात्रपाळीत ड्यूटीवर होत्या. त्या घाडगे यांच्या दिशेने धावल्या. कसेबसे त्यांना कडाळेच्या तावडीतून सोडविले; मात्र वॉर्डच्या व्हरांड्यात कडाळे याने घाडगे यांना पुन्हा मारहाण केली. गोरे आणि मसुगडे तिकडे धावल्या, तेव्हा कडाळेने त्यांनाही मारहाण केली. आपल्या पाठीत त्याने जोरदार गुद्दे मारल्याचे निर्मला गोरे यांनी सांगितले. मसुगडे यांनाही त्याने लाथाबुक्क्यांनी मारले. (प्रतिनिधी)


सुमारे दीड वर्षापूर्वी डॉ. राम जाधव आणि डॉ. प्रकाश पोळ यांना रुग्णांच्या नातेवाइकांनी मारहाण केली होती. त्यावेळी रुग्णालय परिसरात पोलीस चौकी उभारण्याचे मान्य करण्यात आले होते. आम्ही यासंदर्भात पालकमंत्र्यांनाही भेटलो होतो. परंतु सुमारे आठवडाभर दोन कॉन्स्टेबल बंदोबस्तासाठी पुरविण्यात आले. नंतर तेही येईनासे झाले. आता तरी तातडीने रुग्णालयात पोलीस चौकी उभारून त्यात कायमस्वरूपी कर्मचारी नेमावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
- सुरेखा चव्हाण, जिल्हाध्यक्षा, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना


अपुरे मनुष्यबळ... त्यात धास्ती!
जिल्हा रुग्णालयाला सव्वादोनशे खाटांची परवानगी आहे. मात्र, कोणत्याही वेळी सुमारे साडेचारशे रुग्ण तिथे दाखल असतातच. प्रत्येक मजल्यावर रात्रपाळीसाठी दोनच आरोग्यसेविका ड्यूटीवर असतात. त्यांना चार वॉर्डांमध्ये धावाधाव करावी लागते. प्रत्येक वॉर्डात सुमारे तीस ते चाळीस रुग्ण असतात. साडेचारशे रुग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईकही रुग्णालयात गर्दी करतात. याखेरीज बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे अकराशे रुग्णांची तपासणी होत असल्याने गर्दी सतत असते. स्वच्छतागृहे चोवीस तास वापरात असतात; मात्र सफाई कामगारांची वानवा आहे. तळमजल्यावरही रात्रपाळीला अपुरे कर्मचारी असतात. रुग्णवाहिका आल्यास त्यांनाच धावपळ करावी लागते. अशातच काही रुग्णांचे नातेवाईक अशा प्रकारे दहशत निर्माण करत असल्याने सतत धास्ती असतेच, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.



रात्री तीनपर्यंत पोलीस ठाण्यात
घडल्या प्रकाराबद्दल तक्रार देण्यासाठी अधिकारी बरोबर आले नाहीत, असे राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण यांनी सांगितले. ‘आम्ही जखमींना घेऊन रात्री अकराच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार नोंदवून होईपर्यंत तिथेच तळ ठोकला. त्यावेळी पहाटेचे तीन वाजले होते,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर जखमी कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले.


महिला रुग्ण भेदरल्या
आजाराने जर्जर झालेल्या या कक्षातील रुग्ण महिला मारहाणीची घटना पाहून प्रचंड भेदरल्या होत्या. दहशत आणि तणावाच्या वातावरणामुळे काही महिला रुग्णांना रडू कोसळले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वॉर्डसमोर वऱ्हांड्यात सीसीटीव्ही कॅमेरा असूनही तो अनेक दिवसांपासून बंद आहे. तो सुरू करण्याची मागणी आपण वारंवार करूनही उपयोग झाला नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Anyone want to ... be beaten up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.