जिल्ह्यात भुईमूग अन् सोयाबीन वगळता इतर तेलवर्गीय पिकांचे प्रमाण अत्यल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:02 AM2021-01-08T06:02:59+5:302021-01-08T06:02:59+5:30
सातारा : बाजारपेठेत दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर वाढत असले तरी, त्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सोयाबीन आणि भुईमूग वगळता इतर तेलवर्गीय ...
सातारा : बाजारपेठेत दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर वाढत असले तरी, त्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सोयाबीन आणि भुईमूग वगळता इतर तेलवर्गीय पिकांचे प्रमाण कमी आहे. करडई, सूर्यफूल, तीळ आणि कारळा या पिकांचे क्षेत्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.
आहारात खाद्यतेल महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे या तेलाची मागणी सतत वाढत जाते. पण सद्यस्थितीत तेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे तेलवर्गीय पिकांना अधिक महत्त्व येऊ लागले आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता, येथे भुईमूग आणि सोयाबीन हीच तेलवर्गीय पिके अधिक प्रमाणात घेतली जातात. कारण, पाण्याची उपलब्धता असल्याने या पिकांचे क्षेत्र चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तर भुईमूग आणि सोयाबीन पीक हक्काचे समजले जाते. सोयाबीन हे फक्त खरीप हंगामातच घेतले जाते. २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये सोयाबीन क्षेत्रात १३ हजार हेक्टरची वाढ झालेली होती. तसेच सोयाबीन हे पीक फक्त पश्चिम भागापुरतेच मर्यादित न राहता जिल्ह्याच्या माण, खटाव अशा दुष्काळी भागातही घेण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलीच अर्थप्राप्ती होताना दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे क्षेत्रात वाढ होत आहे.
करडई पीक नावापुरतेच..
जिल्ह्यातील बहुतांशी शेती तुकड्याची आहे. त्यातच पश्चिम भागात मोठी धरणे आहेत. पाण्याची उपलब्धता झालेली आहे. पिकांना पाणी कमी पडत नाही. या तुलनेत पूर्वेकडील भाग दुष्काळी. दोन-तीन वर्षातून दुष्काळी स्थिती निर्माण होते. त्यातच शेतकऱ्यांचा कल नगदी पिके, फळबागांकडे अधिक आहे. त्यामुळे सोयाबीन आणि भुईमूग ही पिके वगळता इतर तेलवर्गीय पिकांकडे कल नाही. जिल्ह्यात शेतकऱ्याने खास करडईचे पीक घेतले, असे उदाहरण दुर्मिळ. त्यामुळे करडई पीक नावापुरतेच असते. दोन वर्षांचा विचार करता, करडई क्षेत्र ५० हेक्टरच्या आत आहे.
सोयाबीनच्या क्षेत्रात सतत वाढ...
जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. या हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे तीन लाख हेक्टरच्या वर असते, तर यामधील ६० ते ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. तसेच भुईमूग खरीप हंगामात घेण्यात येतो. तसेच पूर्व भागातील शेतकरी रब्बीच्या काळातही हे पीक घेतात. जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पूर्वेकडे अत्यल्प प्रमाण. त्यातच पश्चिम भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळलेला आहे. उसानंतर सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेतली जातात. त्यामुळे तेलवर्गीय पिकांकडे ओढा खूपच कमी आहे. करडई, कारळा, सूर्यफूल अशी पिके कुठेतरी घेतली जातात. पण, याचे क्षेत्र हे मर्यादित असते.
- रामराव पाटील, शेतकरी
तेलपीक पेरणी क्षेत्र
२०२० २०१९ घट वाढ
[हेक्टरमध्ये)
करडई ४६ ३६ ... १०
सोयाबीन ७३३२९ ६००७५ ...१३२५४
सूर्यफूल १४१ १२९ ... १२
भुईमूग ३३०९३ ३३४९१ ३९८ ...
कारळा ६४७ ६८२ ... ३५