खटावमध्ये जनता कर्फ्यूचे आवाहन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:35 AM2021-04-19T04:35:37+5:302021-04-19T04:35:37+5:30
खटाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच कोरोनाच्या रुग्ण संख्येत होत असलेली वाढ खटावकारांच्या दृष्टीने धोक्याची तसेच चिंतेची गोष्ट ...
खटाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच कोरोनाच्या रुग्ण संख्येत होत असलेली वाढ खटावकारांच्या दृष्टीने धोक्याची तसेच चिंतेची गोष्ट असल्यामुळे वाढणाऱ्या रुग्ण संख्येला खंडित करण्यासाठी खटाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्तरीय समितीच्या वतीने रविवार, दि. १८ ते गुरुवार, दि. २२ पर्यंत पूर्णपणे जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. याला खटावमधील नागरिकांनी प्रतिसाद देत नित्याचे व्यवहार तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत साथ दिली आहे.
राज्यात पंधरा दिवसांचे लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नियमांचे पालन न करता तसेच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करून देखील लोक बिनधास्त रस्त्यावर फिरू लागल्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे कुठेतरी यावर आळा बसण्याकरिता खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने कडक लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.
नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत होता, तसेच कोरोनाची भीती न बाळगता संचारबंदी असतानाही मुक्तपणे संचार करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्यामुळे अशा लोकांवर करडी नजर ठेवून गावातून सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, सदस्य दीपक घाडगे, उत्तम बोर्गे, राहुल जमदाडे आदींसह सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डमधून फिरून संचारबंदी तसेच लॉकडाऊन पाळले जात आहे का? याकडे लक्ष देताना दिसून येत होते.
१८खटाव
खटावमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.