खेमावती नदीच्या पात्राला उकिरड्याचे स्वरूप
By Admin | Published: March 29, 2016 10:08 PM2016-03-29T22:08:46+5:302016-03-30T00:25:14+5:30
कचऱ्याचा खच : लोणंदमधील गटारे तुंबलेली अन् मोकाट जनावरांचा सुळसुळाट--लोणंदचं रणकंदन
राहिद सय्यद -- लोणंद -लोणंद शहरातून वाहणाऱ्या खेमावती नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी काटेरी झुडपे, पान कनिस, जलपर्णीने आच्छादन आहे. नागरिकांकडून नदीत कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे नदीपात्राला उकिरड्याचे स्वरूप आले आहे.
लोणंद गावातील गटारे व सांडपाणी या नदीपात्रात सोडल्याने नदीचे गटार झाले आहे. अरुंद उतार आणि उघडी गटारे, त्यातच टाकला जाणारा ओला व सुका कचरा, आजूबाजूला पडलेले प्लास्टिक अन्य प्रकारचा कचरा त्यात टाकला जातो. त्यामुळे या भागातील गटारे सातत्याने तुंबलेली दिसतात. त्यातच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे प्रभाग ७,८ व ९ या तिन्ही प्रभागांतील नागरिकांना सांडपाणी व्यवस्था गटारेअंतर्गत रस्ते अशा भरपूर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
लोणंद खंडाळा रस्त्यालगत असलेल्या बाजारतळ व एचपी गॅस एजन्सीच्या बाजूला उघड्या गटारातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील लोकांना नेहमी आजाराला सामोरे जावे लागते. लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचाराची आघाडी घेतली असता या प्रश्नांकडे मात्र ७, ८ व ९ या प्रभागांतील उमेदवारांनी लक्ष देण्याची गरज आहे. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या १७ जागांसाठी ५० टक्के महिला आरक्षण असल्याने लोणंद नगरपंचायतीत महिलाराज येणार आहे. या प्रभागांमध्ये महिलांचे वर्चस्व राहील.
प्रभाग ७ हा १११४ लोकसंख्येचा प्रभाग असून, मतदार संख्या ६२२ इतकी आहे. येथे इतर मागास महिला आरक्षण आहे. प्रभाग ८ हा बिरोबा वस्ती, शेळके वस्ती, आनंदनगर परिसर मतदार संख्या १,२११ आहे.
मूलभूत सुविधा तरी पुरवा...
कचरा कुंडी नसल्याने नागरिक सर्व कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात, त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने आसपासच्या परिसरामध्ये दुर्गंधीचे वातावरण पसरते.
- लीला क्षीरसागर, प्रभाग ७
या प्रभागांमध्ये पाणी अनियमित व एक दिवसाआड येते. कचऱ्याची विल्हेवाट लावणे, गटारे साफ करणे या मूलभूत सुविधांचा अभाव असून, या प्रभागात नागरिकांसाठी लहान मुलांसाठी प्ले-ग्राउंड होण्याची गरज आहे.
- नानासो केसकर, प्रभाग ८
खेमावती नदीचे प्रदूषण टाळले पाहिजे, सांडपाणी, सुका कचरा, ओला कचरा घनकचरा याचे व्यवस्थापन केले पाहिजे. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले पाहिजे.
- महादेव क्षीरसागर, प्रभाग ९