बियाणे, यांत्रिकीकरणासाठी ३९ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:35+5:302021-05-28T04:28:35+5:30

सातारा : शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. आतापर्यंत बियाणे, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादन आदींसाठी ...

Applications of 39,000 farmers for seeds and mechanization | बियाणे, यांत्रिकीकरणासाठी ३९ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

बियाणे, यांत्रिकीकरणासाठी ३९ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

Next

सातारा : शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. आतापर्यंत बियाणे, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादन आदींसाठी ३९ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. ऑनलॉईन लॉटरी पध्दतीने सोडत होणार असून, सद्यस्थितीत बियाण्यांसाठी उद्दिष्टापेक्षा कमी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिकांसाठी अनुदान तत्त्वावर शासन बियाणे उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी येत्या खरीप हंगामात प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी किटसाठीही महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागवले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज केले. आतापर्यंत कृषी यांत्रिकीकरणासाठी २४,६९३ शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. या अंतर्गत ट्रॅक्टर, रोटावेटर आदी यंत्रे मिळतात तर सिंचन सुविधा व साधनांतर्गत पाईप्स, विद्युत मोटार, तुषार सिंचन, ठिबकसाठी अनुदान देण्यात येते. फलोत्पादनमध्ये शेडनेट, शेततळे, कांदा चाळसाठी मदत दिली जाते.

यावर्षी कडधान्य बियाणे २५ व ५० रुपये प्रतिकिलो, संकरीत मका व बाजरी १०० रुपये प्रतिकिलो, ज्वारी व बाजरी ३० व १५ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाणे १२ रुपये किलो दराने मिळणार आहे. एका शेतकऱ्याला २ हेक्टरपर्यंत लाभ मिळणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एक एकरइतके खतही मिळणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण औषधे यासाठी प्रतिएकरी एका पिकासाठी २ ते ४ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमातीतील शेतकऱ्यांसाठीही शासनाची योजना आहे. या अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर १,३५७ शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे.

चौकट :

बियाणे, खतासाठी कमी अर्ज...

बियाणे मिनी किटसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी तूर, मूग आणि उडीद यापैकी एका पिकाचे ४ किलोचे मिनी किट मिळणार आहे. चार किलो तूर ४१२ रुपये, चार किलो मूग ४०७ रुपये व चार किलो उडीद ३४९ रुपये दराने मिळणार आहे. मिनीकिटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे. या सर्वांसाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. सद्यस्थितीत अर्ज कमी आलेले दिसत आहेत.

चौकट :

निवड झाल्यावर येणार एसएमएस...

विविध लाभ योजनांसाठी ऑनलाईन लॉटरी काढली जाणार आहे. त्यात निवड झालेल्या शेतकऱ्याला नोंदणीकृत मोबाईलवर तसा एसएमएस येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडीच्या चौकशीसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच संकेतस्थळावरही शोधाशोध करावी लागणार नाही.

चौकट :

अनुदानापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांनी भरायची...

१. मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे.

२. या सर्व अनुदान तथा लाभांसाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.

चौकट :

कोणत्या योजनेसाठी किती अर्ज...

कृषी यांत्रिकीकरण - २४,६९३

सिंचन सुविधा व साधने - १०,०२७

फलोत्पादन - ३,६७८

बियाणे व रासायनिक खते - १,३५७

एससी, एसटी समाज योजना - १,३५७

................................

शेतकरी म्हणतात...

कोट -

बियाणे आणि यांत्रिकीकरणासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे. गावाकडे इंटरनेटची समस्या असल्याने पोर्टलवर अर्ज दाखल करण्यात अडचणी आल्या. कृषी सहाय्यकांनी मार्गदर्शन केल्याने अर्ज करणे सोपे गेले. आता निवड होण्याची प्रतीक्षा आहे. अनुदानावर सिंचनाचे साहित्य मिळाल्यास फायदा होईल. खरिपाचा हंगाम तोंडावर आला आहे, त्यामुळे बी-बियाणे, खतेदेखील वेळेत मिळायला हवीत.

- शांताराम पाटील, शेतकरी

.....................

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलचा वापर शासकीय योजनांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत नाहीत. सुशिक्षित शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यांना अनेकवेळा माहिती नसते. काही प्रमाणात फसवाफसवी होईल, अशीही अनेक शेतकऱ्यांना भीती असते. त्यामुळे असे शेतकरी अर्ज करत नाहीत. यासाठी शासनाने सोपी, सुटसुटीत पद्धत तयार करावी व त्याची माहिती ग्रामीण भागात द्यावी. तरच गरीब व सामान्य शेतकऱ्याला फायदा होईल.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

.................................................................

Web Title: Applications of 39,000 farmers for seeds and mechanization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.