ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा, सातारा जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने
By नितीन काळेल | Published: February 12, 2024 06:49 PM2024-02-12T18:49:15+5:302024-02-12T18:49:37+5:30
सातारा : मागील तीन महिन्यांचे किमान वेतन अनुदान तातडीने बॅंक खात्यात जमा करावे, अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतनश्रेणी लागू ...
सातारा : मागील तीन महिन्यांचे किमान वेतन अनुदान तातडीने बॅंक खात्यात जमा करावे, अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आणि सरचिटणीस काॅ. शामराव चिंचणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
याबाबत जिल्हा परिषदेला निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यामध्ये पंचायत राज कार्यालयाकडे अुनदानाबाबत जिल्ह्यातून पाठविलेल्या माहितीमध्ये त्रुटी आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या अनुदानापेक्षा कमी अनुदान जमा होत आहे. त्यामधील जाचक अटी रद्द करुन आणि प्राप्त माहितीचा फेरविचार करुन न्याय्य अनुदान देण्यात यावे.
ग्रामविकास विभागाने किमान वेतनातील मागील १९ महिन्यांचे थकित अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार तातडीन अनुदान बॅंक खात्यात जमा करावे. भविष्य निर्वाह निधीत ८.३३ दरानुसार शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित हिस्सा जमा करण्याचा आदेश ग्रामपंचायतींना द्यावा. किमान वेतनातील ग्रामपंचायतींना मागील थकित हिस्सा फरक अदा करण्याचे आदेश द्यावेत, प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत किमान वेतन अनुदान बॅंक खात्यात जमा करावे. दीपक म्हैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशीही आमची मागणी आहे.