सेक्स रॅकेटच्या तपासासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती; पोलीस अधीक्षकांचा आदेश
By संजय पाटील | Published: August 22, 2024 11:18 PM2024-08-22T23:18:15+5:302024-08-22T23:19:27+5:30
रॅकेटमध्ये हात असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत
संजय पाटील
कऱ्हाड : आश्रमाच्या नावाखाली महिलेला देहविक्री करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार कऱ्हाडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आश्रम चालक महिलेसह आणखी एकावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केले आहे. तसेच संशयित महिलेवर अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याप्रकरणी गुरुवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. त्याबाबतचा आदेश गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी काढला आहे.
कराड तालुक्यातील टेंभू येथे आश्रम चालविला जात होता. हा आश्रम चालवणाऱ्या महिलेने दुसऱ्या एका महिलेला पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने याबाबत कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आश्रम चालक महिलेसह अन्य एकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केले. तसेच आश्रमात राहणाऱ्या एका मतिमंद मुलीचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा गुन्हाही गुरुवारी संशयित महिलेवर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराडात भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची त्यांनी नेमणूक केली.
पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाकडून या गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. या रॅकेटमध्ये हात असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. या गुन्ह्यात हात असलेल्या कोणालाही सोडणार नाही, असा इशारा अधीक्षक शेख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.