अपघात रोखण्यासाठी तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:38 PM2023-04-07T13:38:01+5:302023-04-07T13:38:30+5:30
रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक जिल्हा विकास आराखड्याच्या १ टक्के निधी उपलब्ध होणार
सातारा : जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण तसेच अपघात रोखण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अपघाताचे विश्लेषण करण्यात येत असून, कारणमीमांसा करून त्यावर करण्यात येणारी उपाययोजना याचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
राज्याचे परिवहन उपआयुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी सातारा जिल्ह्यातील अपघात विश्लेषण व उपाययोजनांबाबत कार्यकारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक जिल्हा विकास आराखड्याच्या १ टक्के निधी उपलब्ध होणार आहे.
तसेच परिवहन कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यामध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामधून अपघाताबाबत माहिती संकलित करणे, त्याचे विश्लेषण व अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तालुकानिहाय रस्त्यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. प्रत्येक रस्त्यावर कोणत्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या सर्व अपघातांचे विश्लेषण केल्यानंतर जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.