'कृष्णा'साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:02+5:302021-05-15T04:38:02+5:30
कराड रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. ...
कराड
रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून शुक्रवारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती केली आहे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २६ जूनला कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली असून, ४७ हजार १६० मतदार आहेत. मतदार यादी अंतिम झाल्याच्या तारखेपासून १० दिवसानंतर व २० दिवसांच्या आत कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम कायद्यानुसार जाहीर होणार आहे. त्यानुसार १५ ते २५ मे दरम्यान कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून त्यास निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सूत्रांकडून समजते. मंजुरीनंतर कारखान्याच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २६ जूनला कारखाना निवडणुकीसाठी मतदान, २८ जूनला मतमोजणी, तर अर्ज दाखल करण्याची मुदत १९ ते २५ मे, १२ जून अर्ज माघार असा संभाव्य कार्यक्रम राज्य प्राधिकरणकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा होईल.