रणरागिणींच्या आक्रमक पवित्र्याने दारूबंदीचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:23 PM2017-10-03T17:23:11+5:302017-10-03T17:23:17+5:30
नागठाणे, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने रविवारी आयोजित केलेल्या सभेमध्ये महिलांच्या आक्रमकतेमुळे दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण गावातून दारूबंदी होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सातारा, दि. ३ : नागठाणे, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने रविवारी आयोजित केलेल्या सभेमध्ये महिलांच्या आक्रमकतेमुळे दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण गावातून दारूबंदी होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सरपंच विष्णू साळुंखे-पाटील यांनी रविवारी होणाºया ग्रामसभेला महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागठाणे येथील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दारूबंदीच्या ठरावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकवटण्याची बहुदा ही पहिलीच वेळ होती. सुमारे ६० ते ७० महिला या ग्रामसभेला उपस्थित होत्या.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागठाणे गावातून दारूचा समूळ नाश करावा तसेच गावात दारू पिणारी व्यक्ती सापडल्यास त्यास दंडात्मक कारवाई करावी व गावचे पालक या नात्याने संबंधिताला शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
सरपंचानी घेतलेल्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. त्यानंतर या सभेत महिलांनी एकमुखाने नागठाणे गावात संपूर्ण दारूबंदी चा ठराव केला. या सभेच्या ठरावाची नक्कल संबंधित कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी लवकरच पाठविली जाईल, असे सरपंच विष्णू साळुंखे यांनी यावेळी सांगितले.