वाईमध्ये गॅस शवदाहिनी उभारणीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:34 PM2021-05-28T16:34:36+5:302021-05-28T16:36:52+5:30
CoronaVirus wai Satara : वाई शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई : शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
मकरंद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इंधन खर्चात बचत करणाऱ्या आणि वृक्ष व पर्यावरण यांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या कामासाठी आमदार आमदार पाटील यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला होता.
वाई रोटरी क्लब व पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संस्थांनी या प्रकल्पासाठी सातत्याने आग्रह धरला होता. त्यानुसार नगरोत्थान योजनेतून शवदाहिनी उभारणीसाठी ६३ लाख, ८७ हजार रुपये तर शवदाहिनीकरिता निवारा शेड बांधकामासाठी १९ लाख, ११ हजार रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वार्षिक योजनेतून करावयाच्या या कामास प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली. त्यानुसार वाई शहरातील मुख्य स्मशानभूमीत एलपीजी गॅस शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. उभारणीनंतर वाई नगरपरिषदेने योजनेची देखभाल करावयाची आहे. असेही मान्यता आदेशात नमूद आहे. दरम्यान पालिकेने त्यासाठी निविदा मागविल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रोटरी क्लबने शहरातील मुख्य स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याची संकल्पना पाच वर्षांपूर्वी मांडली होती. पालिकेच्या सहकार्याने व लोकसहभागातून हा प्रकल्प हाती घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली होती. तसेच आमदार मकरंद पाटील याच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, खर्च वाढल्याने या प्रकल्पाचा नाद सोडला होता. परंतु दोन वर्षांपूर्वी आमदार पाटील यांनी स्वतः भेटून सदर प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला. त्यानुसार त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. पालिका प्रशासनाने व पदाधिकारी यांनी लवकरात लवकर प्रकल्प उभा करावा, अशी मागणी वाई रोटरी क्लबचे डॉ. शरद अभ्यंकर यांनी केली आहे.