फलटणकरांसाठी खुशखबर; निरा देवघर प्रकल्प व फलटण पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामांना मिळाली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:19 PM2023-01-31T16:19:03+5:302023-01-31T16:19:46+5:30
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली याबाबत माहिती
फलटण : फलटण, खंडाळा,माळशिरस तालुक्याच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याच्यादृष्टीने महत्वपुर्ण असणाऱ्या व गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या निरादेवघरच्या उर्वरित कामांना राज्य सरकारकडून ३९७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता व फलटण पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामासाठी बाराशे कोटी रुपयांसह अन्य महत्वपुर्ण कामांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारंवार पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज याप्रश्नी बैठक झाली. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. मुंबई येथील मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खा रणजितसिंह यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, शहाजीराव पाटील, आ. राहुल कुल, जयकुमार शिंदे, धनंजय साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले उपस्थित होते
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, निरा देवघर प्रकल्पाची लांबी २०८ किमी असून याच्या लाभ क्षेत्रात फलटण तालुक्यातील ५१ गावे येत असुन सिंचन १३५५० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. माळशिरस तालुक्यातील १६ गावे येत असुन १०९७० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने आंदोलने केली होती, व सदर आंदोलन आपण सुरु ठेवले होते. केंद्र व राज्य सरकारकडे याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता त्यास आज मुर्त स्वरुप प्राप्त होऊन मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली.
फलटण तालुक्यातुन ब्रिटीश कालीन मंजुर असलेला व रखडलेल्या फलटण पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या कामासाठी सुमारे बाराशे कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हा रेल्वे प्रकल्प केंद्र व राज्य यांच्यात संयुक्त भागीदारीतुन होणार आहे. त्यासाठी राज्याच्या वाट्याच्या खर्चापैकी बाराशे कोटी रुपये रेल्वे मार्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुर करण्यात आले आहेत. याचबरोबर फलटण तालुक्यातील दुसरी नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीसही मान्यता देण्यात आली आहे.
झिरपवाडी( ता. फलटण) येथील अनेक वर्ष बंदावस्थेत असलेल्या ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यास व फलटण शहरातील पन्नास खाटांचे असलेले उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे करण्यासही मान्यता मिळाली आहे व यासाठी बासष्ट कोटीची तरतुद करण्यात आली आहे. माढा व फलटण येथे मंजुर झालेल्या सेशन कोर्टास इतर सुविधा व इमारत तरतुदीसाठी निधी मंजुर झाला आहे. फलटण तालुक्यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे तीनशे नवीन विद्युत रोहित्र मंजुर करण्यात आली आहेत.
पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे
कामांना मिळालेल्या मंजुरीची माहिती समजताच फलटण तालुक्यात भाजपच्या वतीने जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली