बारामतीचे मेडिकल कॉलेज चव्हाणांच्या सहीनेच मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:53+5:302021-09-27T04:42:53+5:30
सातारा : ‘मुख्यमंत्रिपदी असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच उरमोडीचे पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत गेले. त्यांच्यात धमक असल्यानेच सातारचे मेडिकल कॉलेज ...
सातारा : ‘मुख्यमंत्रिपदी असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच उरमोडीचे पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत गेले. त्यांच्यात धमक असल्यानेच सातारचे मेडिकल कॉलेज झाले. बारामतीचे मेडिकल कॉलेजही चव्हाण यांच्याच सहीने मंजूर झाले,’ असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी अजित पवार यांना नाव न घेता लगावला.
दरम्यान, डॉ. जाधव यांनी सोमवारच्या भारत बंदमध्ये जिल्हावासीयांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुरेश जाधव बोलत होते. केंद्र शासनाच्या विरोधात सोमवारी काँग्रेसच्या वतीने भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. विजयराव कणसे, अन्वर पाशा खान, रफिक बागवान, मनोजकुमार तपासे, रजनी पवार, नरेश देसाई आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव म्हणाले, ‘मागील ७ वर्षांपासून देशात भाजप सत्तेवर आहे. देशातील लोकांना खोटी आश्वासने देऊन मोदी सत्तेवर आले. आता त्यांचा हुकूमशाही कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात काळे तीन कायदे केले. गेले ११ महिने दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना सरकार विचारत नाही. उलट त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे देशाची सार्वजनिक मालमत्ता विकली जात आहे. देशात बेरोजगारी वाढली आहे. इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या सर्वांच्या विरोधात व भाजपच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी देशव्यापी बंद आहे. यामध्ये जनतेने सहभागी व्हावे.’
वडूज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडिकल कॉलेजवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरही डॉ. जाधव यांनी भाष्य केले. डॉ. जाधव म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यात धमक होती. त्यामुळेच माण, खटाव तालुक्यात उरमोडीचे पाणी गेले. राज्यात १०८च्या माध्यमातून रुग्णवाहिका फिरत आहेत. यामुळेच हजारो जणांचे प्राण वाचले. मात्र, मागील २५ वर्षे सातारा जिल्हा पाठीमागे असतानाही त्यांनी काही केले नाही.
......................
चौकट :
सातारा पालिकेचा निर्णय स्थानिक पातळीवर...
पत्रकार परिषदेत सातारा पालिका निवडणूक काँग्रेस लढविणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर डॉ. जाधव यांनी पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा विचार आहे. तरीही स्थानिक पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तर यावेळी रफिक बागवान यांनी सातारा पालिकेत काँग्रेसचे ६ ते ७ नगरसेवक निवडून आल्याचे दिसेल, असे स्पष्ट केले.
..................................................
जिल्हा बँकेसाठी ४ जागा हव्यात...
काँग्रेस जिल्हा बँक निवडणूक लढविणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव यांनी बँक निवडणुकीबाबत सर्वेक्षण केले आहे. निवडणूक पक्षविरहीत व्हावी. आम्ही पक्षासाठी ४ जागा मागितल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे सांगितले.
......................................................