माणच्या सभापतींवरील अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:00+5:302021-04-13T04:38:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दहिवडी : माण पंचायत समितीच्या सभापती कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव ८ विरोध २ ने मंजूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी :
माण पंचायत समितीच्या सभापती कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव ८ विरोध २ ने मंजूर झाला तर उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावरील अविश्वास ठराव २ विरोध ८ ने बारगळला. त्यामुळे तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
माण पंचायत समितीमध्ये एकूण १० सदस्य आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाचे तीन सदस्य आहेत. तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख गटाचेही तीन तर शिवसेनेचे शेखर गोरे यांच्या विचाराचे तीन आणि जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या गटाचा एक सदस्य आहे. पाठीमागीलवेळी सभापतिपदासाठी तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी आमदार गटाच्या रंजना जगदाळे व देशमुख गटाच्या ललीता विरकर यांना प्रत्येकी ३ मते तर शेखर गोरे गटाच्या कविता जगदाळे यांना ४ मते मिळाली. त्यामुळे कविता जगदाळे सभापती झाल्या होत्या.
दरम्यान, सभापती कविता जगदाळे व उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे इतर ८ सदस्यांनी अविश्वास ठराव प्रत्यक्ष हजर राहून दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी पिठासन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष बैठक बोलावली होती. यावेळी सभागृहात सर्व सदस्य उपस्थित होते.
सभापती जगदाळे यांच्या विरुध्दचा आविश्वास ठराव २ विरुध्द ८ मताने मंजूर करण्यात आला. तर उपसभापती विरुध्दचा ठराव ८ विरुध्द २ मताने नामंजूर झाला. यामुळे सभापतींना पायउतार व्हावे लागले तर उपसभापती कट्टे यांची खुर्ची शाबूत राहिली आहे. यावेळी दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट :
- माण पंचायत समितीवर शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सभापती होता. आता त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे.
- प्रभाकर देशमुख गटाच्या तानाजी कट्टे यांच्यावरील आविश्वास ठराव नामंजूर झाला. त्यामुळे कट्टे यांना दिलासा मिळाला आहे.
- सभापतीसाठी अनेकांच्या सुप्त इच्छा आहेत. नेत्यांना बाजूला ठेवून सदस्यांनी घेतलेल्या निर्णयात कोणाला संधी मिळणार की सभापतीपद वाटून घेणार याबाबत उच्छुकता लागली आहे.