दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आणलं ‘अ‍ॅप्स’

By admin | Published: June 26, 2015 11:24 PM2015-06-26T23:24:22+5:302015-06-27T00:19:13+5:30

तंत्रज्ञानाचा आधार : म्हसवड येथील बालाजी जाधव या गुरुजींनी दिला नवा फंडा -

'Apps' brought to reduce the hurdle | दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आणलं ‘अ‍ॅप्स’

दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आणलं ‘अ‍ॅप्स’

Next

सातारा : चिमुकल्या जिवांच्या पाठीवर दप्तरांचं ओझं लादताना प्रत्येक माउलीच्या पापणींच्या कडा ओल्या होतात; पण त्या काही करू शकत नाहीत. यावर अनेक उपाय सुचविले जात असतानाच, म्हसवड येथील समूह साधन केंद्रातील बालाजी जाधव यांनी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. यामुळे चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गात एकही पुस्तक नेण्याची गरज नाही.
सध्याचा जमाना माहिती तंत्रज्ञान आणि स्मार्ट फोनचा आहे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतो. ‘आरटीई’ तत्त्वानुसार कौशल्य शिक्षण अंगीकारले आहे. त्यामध्ये क्रमिक पुस्तकांचा वापर कमीतकमी करून हसत खेळत शिक्षण देणे अपेक्षित आहे.
बालाजी जाधव यांनी त्यांच्या नावाने ब्लॉग तयार केला आहे. त्यावर हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. सुमारे सात महिने अहोरात्र प्रयत्न करून प्रायोगिक तत्त्वावर चौथीच्या वर्गातील सर्व विषयांची माहिती संकलित केली आहे. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईल, संगणक किंवा टॅबवर डाउनलोड केल्यानंतर ‘आॅफलाईन’ही ते चालविता येते. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये प्रत्येक विषयाच्या प्रत्येक घटकावर पन्नासहून अधिक प्रश्न, स्वाध्याय तयार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात एकही पुस्तक नेण्याची गरज नाही.
राज्य शासनाने प्रधान सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ निर्मिती तंत्रज्ञान टीम तयार केली आहे. यामध्ये जाधव यांची निवड झाली आहे. तसेच राज्यभर ‘कार्यप्रेरणा’ शिबिर घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे राज्यभरातील सुमारे एक लाख शिक्षकांकडे हे अ‍ॅप्लिकेशन असल्याचा त्यांचा दावा आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, कोयनानगर, सातारा तालुक्यातील काही भाग व महाबळेश्वर तालुक्यातील अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. त्याठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. अशा वेळीही हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरत आहे. एकदा डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट सुविधांशिवाय चालू शकते. तसेच त्याची साईजही कमी आहे. (प्रतिनिधी)

बदलत्या काळानुसार मुलांना व्हिडीओ, झिंगल ट्यूनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविल्यास पटकन लक्षात येते. त्यामुळे हे अ‍ॅप्स तयार केले आहे. राज्य शासनाने राज्यातील विविध विषयांतील तज्ज्ञांची टीम तयार करून मजकूर गोळा केला तर इतर वर्गांसाठीही ते बनविता येईल. त्यामुळे नक्कीच पाठीवरील दप्तराचे ओझे नक्कीच कमी होणार आहे.
- बालाजी जाधव
उपशिक्षक, म्हसवड

गतवर्षीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व जुनी पुस्तके जमा केली आहेत. तीच पुस्तके आम्ही त्या त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये हाताळण्यासाठी देणार आहोत. त्यामुळे त्यांची नवी पुस्तके घरीच राहतील व दप्तराचे ओझे कमी व्हायला मदत होईल. गृहपाठाच्या वह्या दररोज शाळेत आणण्याऐवजी आठवड्यातून एकदा त्या तपासण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
- मंजिरी ढवळे, मुख्याध्यापिका
लाहोटी कन्या प्रशाला, कऱ्हाड


मुलांना फक्त भाषा विषयांचीच पुस्तके दररोज आणावयास सांगितले जातील. गृहपाठाच्या वह्या घरीच ठेवायला सांगितल्या असून, तपासण्यासाठी आठवड्यात एकदा शाळेत आणण्यास सांगता येतील. इतर पुस्तके व वह्या त्यांच्या बाकड्यामध्ये ठेवण्याची व्यवस्था करून प्रत्येक वर्गाची चावी वर्ग शिक्षकाकडे देऊन ते सांभाळण्याची जबाबदारी दिली जाईल.
- बी. ए. पाटील, मुख्याध्यापक, महर्षी शिंदे विद्यालय, वाई

पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी आम्ही वेगळा प्रयोग करणार आहोत. आमच्या शाळेत वेळापत्रकात लवचिकता आणून पुस्तके किंवा वह्या शाळेत न आणता तासिकानिहाय आणाव्यात. प्रयोगवही, कला आदीच्या वह्या शाळेतच ठेवण्याची सोय केली आहे. शाळेत पोषणआहार, पाणी उपलब्ध असल्याने घरातून डबा किंवा बाटली आणण्याची गरज नाही.
- राजश्री बोबडे,
मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, बिबी, ता. फलटण

Web Title: 'Apps' brought to reduce the hurdle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.