एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करुया... नेटिझन्सची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:17 PM2018-03-31T17:17:22+5:302018-03-31T17:17:22+5:30
एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशू-पक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सची पुढाकार घेतला आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.
सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशू-पक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सची पुढाकार घेतला आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.
सोशल मीडिया हे केवळ संवादाचेच नव्हे तर जनजागृतीचेही प्रभावी माध्यम बनू पाहत आहे. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असो की आर्थिक मदत असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो आपापल्या परीने मदतीसाठी धावून येतो.
वाढत्या उष्म्याचा जसा माणसांवर परिणाम होतो तसाच परिणाम पशू-पक्ष्यांवरही होतो. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने पशू-पक्षी कासावीस होतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले. परिणामी अनेकांकडून रस्त्याच्याकडेला, झाडांवर, डोंगरांवर पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था केली गेली.
सध्या तापमानवाढ ही समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेसुमार जंगलतोड आणि वणव्यामुळे हजारो झाडे जळून खाक होत आहे. ही बाबत तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. वाढते तापमान रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा नेटिझन्सची पुढाकार घेतला आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर आवाहन केले जात आहे.
एप्रिल महिन्यात एकमेकांना फसवून एप्रिल फूल करण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षी एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या अशी आर्त हाक नेटिझन्सकडून दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे सातारकरांनी या हाकेला प्रतिसाद देत वृक्ष लागवडीसाठी पुढाकारही घेतला आहे.