कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गालगत मनमानी खाेदाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:15+5:302021-06-24T04:26:15+5:30
ढेबेवाडी : खासगी मोबाईल कंपनीच्या केबलसाठी कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गालगत करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...
ढेबेवाडी : खासगी मोबाईल कंपनीच्या केबलसाठी कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गालगत करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून रखडलेल्या या कामामुळे रस्त्यावरच अतिक्रमण झाल्याने छोट्या-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चुकीच्या कामामुळे एका तरुणाचा बळी गेला; मात्र बांधकाम विभाग आता मोठ्या दुर्घटनेची वाट बघतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून वाहनचालकांचा प्रवास सुखकर झाला होता. कऱ्हाड ते ढेबेवाडीपर्यंतचा प्रवास काही मिनिटांमध्ये होऊ लागला. यामुळे वेळेची बचत होऊ लागली. मात्र, काही मोबाईल कंपन्यांच्या खोदकामामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. कऱ्हाडकडून ढेबेवाडीकडे येत असताना रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे.
गेल्या महिनाभरापासून मोबाईल कंपनीच्या केबलचे काम सुरू आहे. यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे रस्त्याच्या कडा काही ठिकाणी तुटल्या आहेत. तसेच रस्त्या खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या खोदकामामुळे एकाचा बळीही गेला आहे.
काही दिवसांपूर्वी कुंभारगाव येथील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला, अजून किती बळी जाण्याची वाट बांधकाम विभाग आणि ठेकेदार बघत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी कऱ्हाडला जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला आणखी एका मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी असेच खोदकाम करण्यात आले होते, त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या मोबाईल कंपनीच्या केबलचे काम सुरु झाले आहे. या कंपन्यांच्या मनमानी खोदकामामुळे रस्त्याची वाट लागली आहे, हे खोदकाम असेच सुरू राहिल्यास रस्ता लवकर खराब होणार आहे, या खोदकामामुळे साईडपट्ट्या नावालाही उरलेल्या नाहीत.
दरम्यान, मोठ्या वर्दळीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने खोदाई चालू आहे. यामुळे नेहमीच वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच खोदाई केलेली मातीही रस्त्यातच टाकल्याने अर्धा रस्ता माखला आहे. ठेकेदाराची ही दादागिरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? अनेक ठिकाणी रस्त्याचे नुकसानही झाले आहे. त्याची दुरुस्ती अथवा भरपाई कोण करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोट...
या खोदकामामुळे कुंभारगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्याच्या कुटुंबाला संबंधित ठेकेदाराने मदत द्यावी, अन्यथा ‘मनसे’कडून तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
- अंकुश कापसे, पाटण तालुका उपाध्यक्ष, मनसे
फोटो आहे...
२३ ढेबेवाडी
खासगी मोबाईल कंपनीच्या केबलसाठी कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गालगत करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे.