सळवेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:18+5:302021-01-13T05:41:18+5:30
सळवे परिसरातील डोंगर कपारीतील ग्रामस्थांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचा वेळ व पैसा वाचावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ...
सळवे परिसरातील डोंगर कपारीतील ग्रामस्थांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचा वेळ व पैसा वाचावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. सुरुवातीपासून या ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत होत्या. मात्र, सध्या या ठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. अशा बेजबाबदार वैद्यकीय अधिका-यांची या ठिकाणाहून त्वरित बदली करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
- कोट
सळवे येथील वैद्यकीय अधिका-यांच्या मनमानी कारभाराबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या परिसरातील जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य असताना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले. मात्र, येथील जनतेवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असेल तर जनअंदोलन उभे करावे लागेल.
- हिंदुराव पाटील, प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
- चौकट
असून अडचण, नसून खोळंबा
सळवे, महिंद, बाचोली, पाळशी व इतर वाड्यावस्त्यांचा या आरोग्य केंद्रांतर्गत समावेश आहे. येथील जनतेला याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार आहे. मात्र, येथे आरोग्याच्या सुविधा मिळत नसतील तर हे आरोग्य केंद्र असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती आहे.
- प्रतिक्रिया
सळवे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चुकीच्या पध्दतीने चालला असून या ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका-यांच्या कामकाजाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. हा दुर्गम परिसरातील दवाखाना असून जनतेला चांगल्या सुविधा मिळत नाहीत. अशा बेजबाबदार अधिका-यांची वरिष्ठांनी दखल घेऊन योग्य ती कारवाईक करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
- प्रतापराव देसाई, उपसभापती
पाटण पंचायत समिती