साताऱ्याचे तख्त अनेक पिढ्या पाहणार, जुन्या वस्तूंचे ‘पुरातत्व’कडून जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 07:17 PM2022-01-21T19:17:55+5:302022-01-21T19:18:37+5:30
साताऱ्याची गादी (तख्त) व मिनियर पेंटिंगचे आयुष्य आणखी पन्नास वर्षे वाढणार
सातारा : ऐतिहासिक वस्त्र, शस्त्र व वस्तूंचे दालन असलेल्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सध्या १०० ते ४०० वर्षे जुन्या वस्तू जतन करण्याचे काम पुरातत्व विभागाने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याची गादी (तख्त) व मिनियर पेंटिंगचे आयुष्य आणखी पन्नास वर्षे वाढणार आहे.
या संग्रहालयातील साताऱ्याची गादी (तख्त), मिनियर पेंटिंग, तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखत, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघ नखे, बंदुकांचे प्रकार, संगिनी, अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला अशा अनेक वस्तू आजही इतिहासाची साक्ष देतात.
हवेतील आर्द्रता व वातावरणातील बदलामुळे साताऱ्याची गादी (तख्त) व मिनियर पेंटिंग जीर्ण होऊन खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाचे तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, कीर्ती जोशी, मिर्झा शाहीद, आनंद शेळके व मधुरा शेळके या तज्ज्ञांची ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन व जतन करण्याचे काम हाती घेतले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची नूतन इमारत ताब्यात मिळताच तातडीने अंतर्गत सजावटीचे काम हाती घेतले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही इमारत लवकरात लवकर पुरातत्व विभागाकडे देण्याची कार्यवाही करावी. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय