शिक्षकांच्या ‘झेडपी एंट्री’ला चाप !--सीईओंची ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 09:09 PM2017-09-14T21:09:54+5:302017-09-14T21:11:35+5:30
सातारा : शालेय कामकाजाला दांडी मारून कुठल्याही कामासाठी शाळेबाहेर जाणे आता शिक्षकांना चांगलेच अंगलट येऊ शकते
सातारा : शालेय कामकाजाला दांडी मारून कुठल्याही कामासाठी शाळेबाहेर जाणे आता शिक्षकांना चांगलेच अंगलट येऊ शकते. जिल्हा परिषदेतही कामासाठी यायचे झाल्यास त्यांना आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. ‘झेडपीच्या नो एंट्रीत’ प्रवेश करणाºया शिक्षकांवर आता कारवाई करण्याची ताकीद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.
शिक्षक संवर्गातील कर्मचारी हे बºयाच वेळा शैक्षणिक कामकाज सोडून त्यांच्या वैयक्तिक कामकाजासाठी जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित राहतात. याचा परिणाम त्यांच्या शाळेतील शैक्षणिक कामकाजावर होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे यापुढे केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक, उपशिक्षक यांना वैयक्तिक कामकाजासाठी जिल्हा परिषदेत विना परवानगी येता येणार नाही, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून परिपत्रक देखील काढण्यात आले आहे.
जिल्'ातील ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने जे शिक्षक आपल्या वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषदेत येऊन केवळ दिवस घालवतात, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शाळेतील गुणवत्तेवर होताना दिसून येतो. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषदेत येण्यासाठी आता यापुढे गटशिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील भेटायचे असल्यास शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीची गरज आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापुढे केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक, उपशिक्षक यांनी त्यांच्या वैयक्तिक कामकाजाबाबत प्रथम विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा, त्यांच्याकडून अपेक्षित काम न झाल्यास गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा. जर तालुकास्तरावर आपले अपेक्षित काम न झाल्यास, शंका निरसन न झाल्यास वरील अधिकाºयांकडे आपण पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यासह शिक्षणाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.
संघटना प्रतिनिधींनाही नियम लागू
शिक्षणाधिकाºयांकडून शंका निरसन अथवा काम झाले नाही तरच मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने संपर्क साधावा. तसेच शिक्षक संघटना प्रतिनिधी देखील संघटनात्मक कामासाठी पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
विना परवानगी आढळल्यास कारवाई
कोणतेही वैयक्तिक काम असल्यास शिक्षक कर्मचाºयाने गटशिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. विनापरवानगीने कर्मचारी जिल्हा परिषदेत आढळल्यास अशा कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई होणार आहे. त्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकांनी सावधान होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागानेदेखील आपल्या हितसंबंधातील शिक्षकांना हा नियम समान पद्धतीने लावून जिल्हा परिषदेत येण्यास मज्जाव करणे अपेक्षित आहे.
प्राथमिक शाळांत शिकणाºया विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, हे शिक्षकांचे प्राधान्याने ध्येय असायला हवे. शालेय कामकाजाच्या वेळेत शिक्षक वैयक्तिक कामासाठी जिल्हा परिषदेत येऊ लागले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, हे लक्षात आल्यानंतर मी शिक्षण विभागाला सूचना केल्या होत्या. सर्वच विभाग प्रमुखांनाही स्थानिक पातळीवर प्रश्न सोडविण्याच्याही सूचना केल्या आहेत.
-डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद