क्षेत्र महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग दर्जा : शासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 03:34 PM2020-03-04T15:34:31+5:302020-03-04T15:36:30+5:30
महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे
सागर गुजर।
सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून विख्यात असलेल्या क्षेत्र महाबळेश्वरला शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. खटाव तालुक्यातील भोसरे आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव पाठोपाठ ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेले क्षेत्र महाबळेश्वर हे तिसरे पर्यटनस्थळ ठरले आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. १७ डिसेंबर २०१८ च्या पत्रान्वये क्षेत्र महाबळेश्वर या पर्यटनस्थळाला ‘ब’ वर्ग पर्यटस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती.
या पर्यटनस्थळाला दरवर्षी अंदाजे १९ ते २० लाख पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठ्या प्रमाणात भेट देणाºया पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व विचारात घेता शासनाच्यावतीने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने क्षेत्र महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. पूर्वी या मंदिरामध्ये गंगा नदीचा प्रवाह होता व त्याच जागेवर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या पाच नद्या उगम पावल्या असून, संपूर्ण भारतात असे एकमेव ठिकाण आहे.
क्षेत्र महाबळेश्वरसाठी आता पर्यटन विभागाचा वेगळा निधी मिळणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे सोपे जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण तीन पर्यटनस्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. सर्व प्रथम खटाव तालुक्यातील भोसरे या गावाला हा दर्जा मिळाला. भोसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव आहे. गुजर यांनी केलेला पराक्रम आणि त्यांनी दिलेले बलिदान हे इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. भोसरे गावाला ऐतिहासिक महत्त्व असले तरी त्या गावाचा विकास पर्यटनाच्या अंगाने होणे जरुरीचे आहे. या गावाला दरवर्षी पाच लाखांच्या आसपास पर्यटक भेट देत असतात. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने शासनाचा अतिरिक्त निधी मिळाला आहे.
मे २०१९ मध्ये नायगाव
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाºया नायगावला ऐतिहासिक महत्त्व आहे. २००४ मध्ये शासनातर्फे नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित स्मारक उभारले होते. या ठिकाणी आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शासनातर्फे ३ जानेवारी रोजी या ठिकाणी मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने नायगावच्या विकासासाठी आणखी निधी मिळाला आहे.
ब वर्ग पर्यटनस्थळासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्याला यश आले, महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही गावांना अधिकचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे.
- मकरंद पाटील, आमदार