क्षेत्र महाबळेश्वर : सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:52 PM2018-03-07T15:52:48+5:302018-03-07T15:52:48+5:30
कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा नेत्रदीपक सोहळा पाहिला.
महाबळेश्वर : कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा
नेत्रदीपक सोहळा पाहिला.
कृष्णाबाईचा उत्सव दरवर्षी कृष्णा नदी किनारी वसलेल्या वाई व कऱ्हाड यासह विविध ठिकाणी साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाची सांगता श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा नदीच्या उगमस्थानी केली जाते. श्री कृष्णादी पंचगंगा देवस्थान ट्रस्ट व श्रीक्षेत्र महाबळेश्वर यांच्या वतीने या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भल्या पहाटेच श्री कृष्णाबाईच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी
फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी असा जयघोषही करण्यात आला. पालखी पंचगंगा मंदिरात आल्यावर कीर्तनकार भास्करबुवा काणे यांचे कृष्णाबाईच्या लळिताचे कीर्तन झाले. गंगा पूजनावेळी कुंडातील पाण्यामध्ये दिवे खेळविले गेले. यानंतर कृष्णाबाई उत्सवाची सांगता करण्यात आली.