मोरणा परिसराला गांजाने केले झिंग झिंग झिंगाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:32+5:302021-04-14T12:56:31+5:30

Crimenews Satara : पाटण तालुक्याच्या मोरणा परिसरात आतापर्यंत देशी दारूचे अवैध अड्डे सापडले. याच भागात दारूचे दुकान असल्यामुळे अनेक जण दररोज नशेत असतात याचे नवल कोणालाच राहिले नाही.

The area of Morna has been ravaged by cannabis ... | मोरणा परिसराला गांजाने केले झिंग झिंग झिंगाट...

मोरणा परिसराला गांजाने केले झिंग झिंग झिंगाट...

Next
ठळक मुद्देमोरणा परिसराला गांजाने केले झिंग झिंग झिंगाट...धावडे गाव प्रशासनाच्या हिटलिस्टवर

पाटण : पाटण तालुक्याच्या मोरणा परिसरात आतापर्यंत देशी दारूचे अवैध अड्डे सापडले. याच भागात दारूचे दुकान असल्यामुळे अनेक जण दररोज नशेत असतात याचे नवल कोणालाच राहिले नाही. याचबरोबर धावडे गावात चक्क गाजांची शेती पोलिसांनी शोधून काढल्यामुळे ऐकावे ते नवलच, अशी चर्चा मोरणा परिसरात सुरू आहे.

पाटण पोलिसांना सापडलेल्या गांजाच्या शेतीमागे किती दिवसांचा किंवा वर्षांचा इतिहास आहे, यामध्ये कोणकोण सामील आहे. या गांजाच्या नशेत किती जण झिंगत होते. या प्रश्‍नांची उकल होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पाटण पोलिसांनी शोधमोहीम राबवून मोरणा विभागात खळबळ उडवून दिली. कारण, धावडे या गावात गांजाची शेती करणारे तिघे जण मुद्देमालासह सापडले. गांजा ही वनस्पती तीव्र नशा आणणारी एक विषारी वर्गात मोडणारी आहे. त्यामुळे गांजाचा समावेश अमली पदार्थ या घटकात होतो. धावडे गावात गावठाणाच्या पाठीमागच्या बाजूला शेतीमध्ये इतर पिकांबरोबर गांजाची रोपे लागवड करून त्याची विक्री करण्याच्या हेतूने जपणूक केली जात होती, असे समोर येत आहे.

धावडे येथे पाटण पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ठेवून अगदी नाट्यमयरीत्या गांजाची शेती उघडकीस आणली. याप्रकरणी तीन शेती मालकांना पाटण पोलिसांनी अटक केली असली तरी अजूनही काही जण शेती करण्यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. पाटण पोलिसांच्या दप्तरी नोंदीवरून एकूण १३ किलो १३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केल्याचे दिसून येत आहे.

पाटण पोलिसांनी कारवाई करताना सोमवारी सकाळी धावडे परिसरात फिल्डिंग लावून जिथे गांजाची शेती होती. त्याच्या आजूबाजूला साध्या वेशात जाऊन शेतकऱ्यांना कसलाही संशय येणार नाही, याची दखल घेत तपास केला. त्यानंतर याप्रकरणी तीन शेतकरी गांजा लागवड केल्याप्रकरणी पोलिसांकडून चतुर्भुज झाले.

धावडे गाव प्रशासनाच्या हिटलिस्टवर

काही दिवसांपूर्वी याच धावडे गावातील एका विहिरीमध्ये तब्बल पाच गवे पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी एका गवारेड्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे धावडे हे गाव प्रकाश झोतात आले होते आणि आता लगेच याच गावात गांजाची शेती सापडल्यामुळे धावडे हे सध्या तरी प्रशासनाच्या हिटलिस्टवर आले आहे.

पाटण पोलिसांकडून गांजाप्रकरणी अधिक तपास करण्याची गरज आहे. कारण, धावडे गावात सापडलेली गांजा शेती किती दिवसांपासून सुरू होती. या शेतीमध्ये पिकवलेला गांजा कोणामार्फत आणि कुठे विक्री केला जात होता, तसेच या गांजाची झिंग कोणाला येत होती, लाखो रुपये किमतीचा पकडलेला गांजा यापूर्वी संशयित आरोपींना किती कमाई देऊन गेला, हे गूढ पाटण पोलिसांनी प्रकाशात आणणे आवश्यक आहे.

Web Title: The area of Morna has been ravaged by cannabis ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.