दुचाकी मागे घेण्यावरून वाद, साताऱ्यात मध्यरात्री तरुणाने केला हवेत गोळीबार
By दत्ता यादव | Published: December 28, 2023 12:54 PM2023-12-28T12:54:43+5:302023-12-28T12:55:03+5:30
सहा जणांच्या टोळक्याकडून कृत्य
सातारा : येथील कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यानंतर एका तरुणाने हवेत गोळीबार करून दहशत माजवली. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कमानी हाैदाजवळ गुरुवारी रात्री एकच्या सुमारास काही तरुण गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका तरुणाने दुचाकी बाजूला घे, असे म्हटल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संबंधित तरुण व त्याच्या मित्राला सहा जणांच्या टोळक्याने मारहाणही केली. त्यातील एका तरुणाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची सातारा शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रिकामं काडतूस पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. हे काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी तातडीने शोध घेतला. पहाटे साडेतीनच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत.
मारहाणीत जखमी झालेल्या विलास वायदंडे (वय २७, रा. शनिवार पेठ, सातारा) या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.