गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांशी हुज्जत, फलटणच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:27 PM2024-09-20T12:27:57+5:302024-09-20T12:28:24+5:30
फलटण : शासकीय कर्तव्य बजावत असताना गणपती विसर्जन मिरवणूक मार्गातील मंडळांना वाहने हळूहळू पुढे घेण्याकरिता विनंती करीत असताना बाल ...
फलटण : शासकीय कर्तव्य बजावत असताना गणपती विसर्जन मिरवणूक मार्गातील मंडळांना वाहने हळूहळू पुढे घेण्याकरिता विनंती करीत असताना बाल शिवाजी गणेश उत्सव मंडळ, बुरुडगल्ली, फलटण या मंडळातील सदस्य माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार याने पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी किशोर उर्फ गुड्डू पवार, धनराज पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी की, गणपती विसर्जन मिरवणूक मार्गातील मंडळाची वाहने सावकाश पुढे घेण्याकरिता विनंती करीत असताना बाल शिवाजी गणेश उत्सव मंडळ, बुरुडगल्ली, फलटण, ता. फलटण या मंडळातील सदस्य किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार याने मला व माझ्याबरोबर असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याशी हुज्जत घातली. ‘आमच्या मंडळाचे वाहन पुढे घेणार नाही, कोण गाडी पुढे घेतो तेच बघतो,’ असे म्हणून पोलिस अधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ करून अंगावर धावून आला असल्याची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक नितीन बाबुराव शिंदे यांनी दिली आहे. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा तपास करीत आहेत.