अर्जुन पुरस्कार विजेता ओजस देवताळे याचा ‘रयत’कडून सन्मान; संस्थेकडून दहा लाखांचा धनादेश सुपुर्द
By सचिन काकडे | Published: December 27, 2023 01:37 PM2023-12-27T13:37:29+5:302023-12-27T13:38:32+5:30
छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेता ओजस प्रवीण देवताळे याचा संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीने दहा लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
सातारा : छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेता ओजस प्रवीण देवताळे याचा संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीने दहा लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड दिलावर मुल्ला, दृष्टी आर्चरी ॲकॅडमीचे प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.
आर्चरी या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी नोंदवणारा ओजस हा मूळचा नागपूर येथील आहे. आर्चरी सारख्या क्रीडा प्रकारात अभिरुची निर्माण होऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न त्याने शालेय जीवनापासून पाहिले होते. १३ ते २१ ऑगस्ट या कालावधीत पॅरिस येथे झालेल्या ह्युंडाई विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत ओजसने कांस्यपदक प्राप्त केले. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा चीन हँगझोऊ येथे झाल्या.
यामध्ये डबल व मिक्स गटामध्ये त्याने तीन सुवर्ण पदके पटकविली. वेस्ट झोन इंटरव्यू युनिव्हर्सिटी आर्चरी स्पर्धेत भटिंडा (पंजाब) येथे कंपाउंड राउंडमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून विद्यापीठाला वेगळा लौकिक प्राप्त करून दिला. ओजसच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्याला ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर केला. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ९ जानेवारी २०२४ रोजी त्याला ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ही अत्यंत आनंददायी अशी घटना आहे.
दि, २८ डिसेंबर पासून पतियाळा पंजाब येथे इंटर यूनिवर्सिटी आर्चरी स्पर्धा सुरू होत आहेत. त्यामध्ये ओजस कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या आर्चरी या क्रीडा प्रकारातील असामान्य कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. ओजसच्या कामगिरीचा हा सन्मान आहे, असे गौरवोद्गार चंद्रकांत दळवी यांनी काढले.