सैन्य दलाच्या तळापासून बनले ‘तळिये’
By admin | Published: March 29, 2015 11:12 PM2015-03-29T23:12:55+5:302015-03-30T00:10:35+5:30
१७ व्या शतकापासून इतिहास : तळहिरा ओढ्याच्या काठी वसले गाव
संजय कदम - वाठार स्टेशन -१७ व्या शतकात कोरेगाव तालुक्यातील देऊर गाव हे नागपूरकर भोसले महाराजांचे संस्थान होते. या काळात या राज्याचे संपूर्ण सैन्य देऊर नजीकच्या तळहिरा ओढ्याकाठी असलेल्या ‘चांदणमाळ’ या ठिकाणी तळ ठोकून होते. हाच तळाचा परिसर आज ‘तळिये’ या नावाने ओळखला जात आहे. गावालाही तेच नाव पडले आहे.
कोरेगाव तालुक्यातील तळिये गावाशी चव्हाण या आडनावाचे मोठे नाते आहे. पूर्वीचे चौहान व आजचे चव्हाण हे मूळ अजमेर, कोटा व बुंदी (राजस्थान) या ठिकाणचे. मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव चव्हाण यांनी मोठी कर्तबगारी दाखवली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा विठोजी चव्हाण यांनी ही राजाराम महाराजांच्या काळात पराक्रम दाखवला. याचा मोबदला म्हणून विठोजी चव्हाण यांना ‘हिंमत ए बहादूर’ हा किताब देऊन शिरोळ, आटपाडी व कवठेमहांकाळ व सांगोला या ठिकाणी जहागिरी मिळाली होती. आटपाडी येथील तीन भाऊ हे नेर (खटाव), दुसरा तळिये (कोरेगाव) व तिसरा चव्हाणवाडी (फलटण) या ठिकाणी स्थायिक झाले. तळिये गावात आजही चव्हाणांच्या मूळ व्यक्तीची गावातील ग्रामदैवत भैरवनाथ व विठ्ठल मंदिरासमोर समाधी आहे, असा इतिहास असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात.
तळिये गावाच्या उत्तरेस सर्मथ वाग्देव महाराजांचे समाधिस्थळ आहे. वाग्देव महाराज हे खंडोबा देवाचे भक्त असल्याने ते नियमित जेजुरीची पायी वारी करत. या काळातच त्यांनी तळिये गावतील भिकू गोपाळ चव्हाण यांच्या शेतात खंडोबाच्या पादुका स्थापन केल्या असल्याचे गावकरी सांगतात. या शेजारीच नाथ पंथीय कानिफनाथांचे मंदिर आहे. तळिये हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाची रचना गोलाकार आहे. गावच्या चारही बाजूंने जाण्या-येण्यासाठी प्रशस्त रस्ते व गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारकरी सांप्रदायिक म्हणून या गावाची या भागात वेगळी ओळख आहे.
१९३६ मध्ये या गावाने ग्रामसुधारणा अभियानात सहभाग घेतला होता. गावातील रस्ते, गटारव्यवस्था पाहून या गावचा गौरव ब्रिटिशांनी केला होता. परंतु याच दरम्यान गावाशेजारील तळहिरा ओढ्यात पूर्व बाजूस एक प्रेत जळत होते. याचा धूर यावेळी गाव पाहण्यासाठी आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्यात गेल्याने तळिये गावाचा पहिला नंबर गेल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. याचा चुकीचा अर्थ काढीत ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची जागा प्रत्येकाच्या शेतातच करण्याचे ठरविले. त्यामुळे गेली ७५ वर्षे या गावास स्मशानभूमीची समस्या आहे. नव्याने हा प्रश्न आता सुटला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. ज्वारी पिकासाठी तळिये हे गाव प्रसिद्ध आहे. येथील ज्वारीस मोठी मागणी आहे. याशिवाय कांदा व बटाटा हे पीक या गावात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
१७ व्या शतकातील
बंधारा आजही...
गावाच्या अगदी जवळूनच तळहिरा ओढा गेला आहे. या ओढ्यावर १७ व्या शतकात नागपूरकर भोसले यांनी देऊर संस्थानासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी बंधारा बांधला होता. आजही हा बंधारा या ठिकाणी अस्तित्वात आहे. याच बंधाऱ्याखाली आता तळहिरा हा मोठा पाझर तलाव बांधण्यात आला आहे. या तलावाचा फायदा तळिये, देऊर व वाठारस्टेशन या गावांना होत आहे.