फलटण येथे अकॅडमीवर सैन्यातील अधिकाऱ्यांचा छापा, बोगस कागदपत्रे-प्रमाणपत्रे आढळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 03:36 PM2022-10-11T15:36:02+5:302022-10-11T15:36:25+5:30
सैन्यात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांकडून लाखो रुपये उकळले
सातारा : फलटण येथील एका भरतीपूर्व अकॅडमीवर सैन्यातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला असून, या छाप्यामध्ये काही बोगस कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रेही आढळून आली आहेत. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
फलटणमध्ये एक भरतीपूर्व अकॅडमी आहे. या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची मूळ कागदपत्रे संबंधित अकॅडमी चालकाने जमा करून ठेवली आहेत. तसेच सैन्यात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांकडून लाखो रुपये संबंधिताने उकळले आहेत. यासंदर्भात तक्रारी झाल्याने केंद्रातील उच्चस्तरीय समितीमधील सैन्यातील अधिकारी सोमवारी सायंकाळी थेट फलटणमध्ये आले.
संबंधित अकॅडमी चालकाची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या हाती काही कागदपत्रेही लागली आहेत. मात्र, नेमकी कोणती कागदपत्रे आहेत, हे मात्र समजू शकले नाही. सातारा पोलिसांचे एक पथकही सैन्यातील अधिकाऱ्यांसोबत असल्याचे समोर आले आहे. फलटण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.