युद्धासाठी सैन्य सज्ज... हातात शस्त्र मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:48+5:302021-04-15T04:37:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये ज्या लोकांनी अधिकृतपणे नोंदणी केली आहे, अशा लोकांना लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये ज्या लोकांनी अधिकृतपणे नोंदणी केली आहे, अशा लोकांना लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहिमेसाठी सैन्य सज्ज केले असले, तरी लसरूपी शस्त्र त्यांना मिळेनात, अशी परिस्थिती आहे.
कोरोना या जागतिक महामारीशी लढा देत असताना लसीकरण मोहीम राबविणे अत्यावश्यक बाब असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शासनानेही लसीकरण मोहिमेबाबत गांभीर्याने घेतले. मात्र, काही दिवसांपासून लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. कोरोना लसीकरणाबाबत सामान्य लोकांमध्ये मोठे गैरसमज होते. मात्र, कोरोनाची लाट पुन्हा उसळल्याने लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. लसीकरणासाठी लोक अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करत आहेत, तसेच प्रशासनाने दिलेल्या वेळेत लसीकरण केंद्रावर जातात. मात्र, सातारा शहरासह जिल्ह्यात लसींचा पुरवठा नसल्याने लोकांना केंद्रावरून आल्या पावली मागे फिरावे लागत आहे.
लोकांच्या गैरसोयीबाबत तक्रारी येत आहेत, याबाबत जिल्हा प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक बाब समोर आलेली आहे. जिल्हा प्रशासनाने ४४६ लसीकरण केंद्र सज्ज ठेवलेले आहेत. पुरेशी लस उपलब्ध असेल, तर एकाच दिवसात ३३,००० लोकांना लसी देण्याचा विक्रमही जिल्हा प्रशासनाने केला आहे. आता मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याने प्रशासन हतबल आहे.
कोरोनाचा प्रकोप झालेला असताना, लसीकरण मोहीम वेगाने करून घेणे अत्यावश्यक आहे. राजकीय मंडळी निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने यंत्र राबवितात, त्याच गतीने लसींचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली, तर लोकांची गैरसोय दूर होईल, तसेच कोरोनालाही रोखता येऊ शकणार आहे. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाखांच्या वर आहे. शासनाने जर लसींचा पुरवठा योग्य पद्धतीने केला नाही, तर इतक्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील, याचा विचार न केलेलाच बरा.
कोट..
लसीकरणासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी एका दिवसात तेहतीस हजार लोकांना लस देण्यात आली. आता लसींचा पुरवठा नसल्याने यंत्रणेला हातावर हात धरून बसण्याची वेळ आलेली आहे. सातारा जिल्हा प्रशासनातर्फे पाच लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. मात्र, लसी उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत.
- डॉ.अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी
चौकट
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोरोना लसीकरणाच्या संदर्भाने आम्ही नोंद केली होती. लसीकरणासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, नेमके त्याच वेळी लसींची उपलब्ध नसल्याचे दवाखान्यातून सांगण्यात आले. वास्तविक प्रशासनाच्या वतीने संपल्याबाबतचा मेसेज जर नोंदणी करणाऱ्या लोकांना गेला असता, तर त्यांचे हेलपाटे थांबले असते. कोरोना महामारीच्या काळात लोकांना रस्त्यावर फिरावे लागत आहे. प्रशासनाने यंत्रणा सुधारली पाहिजे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
आज अखेर केलेले लसीकरण
पहिला डोस : ३२००३९
दुसरा डोस : ४०८१३
एकूण : ३६०८५२
शिल्लक लसी : २३,०७०
बुधवारी झालेले लसीकरण : ५,४८२