एमआयएमला सेना जशास तसे उत्तर देईल
By admin | Published: August 31, 2015 08:56 PM2015-08-31T20:56:45+5:302015-08-31T20:56:45+5:30
नितीन बानुगडे-पाटील : ओवेसी कलामांचा नव्हे, तर औरंगजेबाचा वारसा जपत असल्याची केली टीका
कऱ्हाड : ‘दिल्लीतील एका मार्गाला औरंगजेबाचे नाव होते, ते बदलून नुकतेच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावर ‘एमआयएम’च्या ओवेसींनी नाराजी व्यक्त केली. यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. ते कलामांचा नव्हे, तर औरंगजेबाचा वारसा जपू इच्छितात. त्यांना शिवसेना जशास तसे उत्तर देईल. जिल्ह्यात एमआयएमचा प्रवेश झाला असला तरी त्याची चिंता करण्याची गरज नाही,’ असे मत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, कऱ्हाड दक्षिणचे तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, कऱ्हाड उत्तरचे तालुकाप्रमुख विनायक भोसले, कऱ्हाड शहरप्रमुख शशिराज करपे, उपशहरप्रमुख सतीश तावरे, दीपक मानकर, मलकापूर शहरप्रमुख मधुकर शेलार आदींची उपस्थिती होती.
प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाचा समारोप होत आहे. गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यामधून चिंतन आणि मंथन अशा दोन्ही गोष्टी झाल्या असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नजीकच्या काळात शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा पक्ष होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात व देशात सध्या शिवसेना सत्तेत सहभागी आहे. आम्ही सरकारमध्ये सहभागी असलो तरी सरकारजमा मात्र नाही. त्यामुळे भूसंपादन कायदा असो, ऊसदराचा प्रश्न असो. यावर शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. अनेक निवडणुकांना सामोरे गेलो आहोत; पण ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांवर जोपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकत नाही, तोपर्यंत मोठ्या निवडणुकांमध्ये यश मिळविणे सोपे नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शिवसेना या निवडणुका स्वबळावरच लढवेल. यात कोणाशीही युती अथवा आघाडी असणार नाही.’ (प्रतिनिधी)
‘शिवगौरव’ पुरस्काराने शिक्षकांचा सत्कार
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अनेकजण करतात; पण गुणवंत विद्यार्थी आणि समाज घडविण्यासाठी शिक्षकाच्या चाकोरीबाहेर जाऊनही अनेकजण काम करतात, अशा प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाचा ‘शिवगौरव’ पुरस्कार देऊन शिक्षक दिनाचे औचित्य साधून लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. बानुगडे-पाटील यांनी यावेळी दिली.
काँग्रेस आघाडीचे सरकार असताना कृत्रिम पावसाचे केंद्र बारामती येथे झाले होते. आता ते मराठवाडा होऊ देणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोयना पाणलोट क्षेत्र परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसे झाले तरच वीज टंचाई व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, असेही प्रा. बानुगडे-पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पंधरा वर्षांपूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पंधरा महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा झाली; मात्र त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने फक्त दोनच योजना मार्गी लावल्या, हे आपले दुर्दैव आहे. त्या योजना मार्गी लावण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करू , असेही बानुगडे-पाटील यांनी सांगितले.
कऱ्हाड जिल्ह्यासाठी आग्रही राहणार
राज्यात जर काही नवे जिल्हे करावयाचे झाल्यास त्यात कऱ्हाडचा आग्रक्रमाने विचार करावा, अशी शिवसेनेची भूमिका राहील. जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांशी बाबी कऱ्हाडत आहेत. त्यामुळे जिल्हा निर्मितीचा मार्ग सुकर आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक त्यासाठी कुठेही मागे राहणार नाहीत.