तापोळ्यात सेना, तर भिलारमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:25+5:302021-01-19T04:40:25+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. यामध्ये पूर्वेकडे राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याचे, तर ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. यामध्ये पूर्वेकडे राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याचे, तर तालुक्यातील पश्चिमेकडे तापोळा भागात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. भिलार येथील दोन जागा वगळता भाजपच्या पदरात काही पडले नाही.
तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. तीन तासांत सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्याच्या पूर्वेकडील भागात राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांनी भिलार, तर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी राजपुरी या आपल्या गावातील ग्रामपंचायतीवरील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शेलार यांनी सौंदरी व कोट्रोशी या दोन्ही ग्रामपंचायतीवर स्वबळावर शिवसेनेचे भगवा फडकाविण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र भिलारे यांचा भाजपच्या नवख्या उमेदवाराने केलेला पराभव हा राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. निकालानंतर शिवसेनेने तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतीवर भगवा फडकाविल्याचा दावा केला आहे. फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करून शिवसेनेने विजय साजरा केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष जाधव उपस्थित होते.
चौकट
सौंदरीत चिठ्ठी टाकून विजयी
सौंदरी ग्रामपंचायतीच्या वार्ड तीनमधील दोन उमेदवारांना समान मते मिळाली. तेव्हा लहान मुलाच्या मदतीने चिठ्ठी टाकून विजयी उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये अरुण चंद्रकांत सपकाळ हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. भिलार येथील सरपंच वंदना भिलारे यांना मतदारांनी पुन्हा विजयी करून आपली पसंती दिली आहे.
क्षेत्र महाबळेश्वर येथील विजयी उमेदवारांनी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली आहे, तर बिनविरोध आलेल्या माचुतर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे व उद्योजक डी. एल. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले आहे.