भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्णिका गुजर-पाटील
By प्रगती पाटील | Published: September 3, 2022 03:55 PM2022-09-03T15:55:41+5:302022-09-03T15:56:16+5:30
अर्णिका यांच्या या निवडीने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सातारा : भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी साताऱ्याच्या अर्णिका गुजर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्णिका यांच्या या निवडीने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू ते प्रशिक्षक पदापर्यंतचा अर्णिका यांचा प्रवास आव्हानात्मक आणि दिशादर्शक असा राहिला आहे.
बंगळूर येथे ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या महिला आशियाई अजिंक्यपद बास्केटबाॅल स्पर्धेर्साठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय संघाची घोषणा केली. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्णिका गुजर - पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्णिकाच्या निवडीनंतर महाराष्ट्रासह साता-यातील क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
या स्पर्धेत अ गटात चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, चायनीज तैपेई, इंडोनेशिया आणि भारत हे देश असणार आहेत. तसेच ब विभागामध्ये मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, सामोआ, मालदीव, जॉर्डन, मंगोलिया आणि फिलिपाइन्स हे देश असणार आहेत.
भारतीय संघ
बीएफआयने स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याबाबतचे ट्विट देखील बीएफआयने केले आहे. भारतीय संघात नितिका अमुथन, दीप्ती राजा, सत्या कृष्णमूर्ती, मेखला गौडा, करणवीर कौर, कीर्ती देपली, मनमीत कौर, इरिन एल्सा जॉन पुथेनोराकल, यशनीत कौर, निहारिका रेड्डी मेकापती, भूमिका सिंग, हरिमा सुंदरी मुनीष्कन्नन यांचा समावेश आहे.
संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका पाटील, प्रशिक्षकपदी अनिथा पॉल दुराई, व्यवस्थापकपदी जरीन पीएस तसेच फिजिओथेरपिस्ट म्हणून अहाना पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.