विलगीकरणात चौदा दिवस राहण्याची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:59+5:302021-05-17T04:37:59+5:30
फलटण : ‘गृहविलगीकरण कक्षात असणाऱ्या लोकांकडून आवश्यक खबरदारी अनवधानाने घेतली जात नाही. आपली प्रकृती बरी आहे, आता काही त्रास ...
फलटण : ‘गृहविलगीकरण कक्षात असणाऱ्या लोकांकडून आवश्यक खबरदारी अनवधानाने घेतली जात नाही. आपली प्रकृती बरी आहे, आता काही त्रास नसल्याचे सांगत ते घराबाहेर पडल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारुन या लोकांना चौदा दिवस बाहेर न पडता तेथे राहण्याची व्यवस्था करा,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा आणि त्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने फलटण पंचायत समितीत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ऑनलाईन बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांच्यासह फलटण पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘सध्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक उपाययोजना गावातच प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे. किमान पंचायत समिती गणनिहाय एक संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारुन तेथे गृहविलगीकरणातील स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था कराव्यात. अधिक रुग्ण संख्या असलेल्या भागात विलगीकरण कक्ष व अन्य उपाय योजना प्राधान्याने राबवाव्यात. केंद्र शासन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीच्या रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे; परंतु गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून नियमांचे पालन करण्यात अडचण निर्माण होत असेल तर त्यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे.
चौकट
वेळोवेळी तपासणी करावी
गृहविलगीकरणामध्ये असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. संबंधित गावातील पूर्वीचे आजार असणाऱ्या नागरिकांचीसुद्धा प्रा. वैद्यकीय तपासणी ग्रामपंचायत, पंचायत समिती व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने करावी, असे निर्देश सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.